Marathi Web Series: ‘सिक्रेट ऑफ गावस्कर’ सीरिजच्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता; क्राईम-थ्रिलरमध्ये तगड्या कलाकारांची वर्णी
'चंद्रा फिल्म एंटरटेनमेंट' निर्मित आणि तेजस लोखंडे दिग्दर्शित ही क्राईम आणि ॲक्शनचा भरणा असलेली वेब सीरिज लवकरच 'व्हीमास मराठी' (Vimas Marathi) या प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
ओटीटी हेच भविष्य आहे असे म्हणणाऱ्या सिनेविश्वात ओटीटीचा जाळ भलताच पसरला आहे. बरेचसे मालिका विश्वातील कलाकारही ओटीटी विश्वात काम करण्यास सज्ज झाले आहेत. क्राईम, रोमान्स, ॲक्शन, वजनदार कथानक, आणि उत्कृष्ट कलाकार यांची सांगड घालत ‘सिक्रेट ऑफ गावस्कर’ (Secret Of Gavaskar) ही नवीकोरी वेब सीरिज (Web Series) तगड्या स्टारकास्टसह प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज होत आहे. ‘चंद्रा फिल्म एंटरटेनमेंट’ निर्मित आणि तेजस लोखंडे दिग्दर्शित ही क्राईम आणि ॲक्शनचा भरणा असलेली वेब सीरिज लवकरच ‘व्हीमास मराठी’ (Vimas Marathi) या प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या आधी व्हीमास मराठीच्या ‘राडा राडा’ या टॉक शो मधून प्राजक्ता माळी आणि पूर्वा शिंदे झळकली त्यांच्या या टॉक शो ला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. आता त्यांची ‘सिक्रेट ऑफ गावस्कर’ ही वेब सीरिज रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला येत आहे. नुकताच या वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
अभिनेता हरीश दुधाडे, संग्राम सामेळ, मयूर पवार, रमेश चांदणे, अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर, दिप्ती लेले, शिल्पा नवलकर, मीरा सारंग, सीमा कुलकर्णी, लतिका सावंत, राधा धरणे या तगड्या स्टारकास्टच्या दमदार भूमिका या वेब सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहेत. प्रत्येक कलाकाराच्या अभिनयाची जादू या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेईल का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. अजिंक्य ठाकूर लिखित ही वेब सीरिज असून याच्या संकलनाची बाजू प्राची पाठारे हिने उत्तमरित्या साकारली आहे. तर क्राईम सीनला कॅमेऱ्यात कैद करण्याची जबाबदारी शिवराज सातार्डेकर याने पेलवली आहे.
पहा ट्रेलर
या वेब सीरिजबद्दल बोलताना दिग्दर्शक तेजस लोखंडे म्हणाला, “सिक्रेट ऑफ गावस्कर ही वेब सीरिज वेगळ्या पठडीतील असून प्रत्येक कलाकाराने केलेले काम हे वाखाणण्याजोगे आहे. या वेब सीरिजमध्ये काम केलेले सर्वच कलाकार माझे मित्र आहेत. साऱ्या कलाकारांचा अभिनयाचा अनुभव दांडगा असल्याने साऱ्यांनीच वेब सीरिजमध्ये उत्तम काम केलं आहे. या वेब सीरिजची कथा प्रत्येक पाचव्या मिनिटाला आपल्याला संभ्रमात पाडतेय, त्यामुळे पुढे काय होतंय याची उत्सुकता आणखीनच ताणली जातेय. या सीरिजमुळे आम्ही एक वेगळा जॉनर प्रेक्षकांसमोर आणला आहे.”