Pathaan: शाहरुख खानच्या ‘पठाण’बाबत दिल्ली हायकोर्टाचे आदेश; चित्रपटात करावे लागणार ‘हे’ बदल
सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'पठाण' या चित्रपटात शाहरुख खानसह दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या 25 जानेवारी रोजी हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे.
नवी दिल्ली: गेल्या आठवड्यात शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर आता दिल्ली हायकोर्टाने यशराज फिल्म्स प्रॉडक्शनला त्यात काही बदल करण्याचे निर्देश दिले आहेत. नव्या रिपोर्टनुसार, कोर्टाने प्रॉडक्शन कंपनीला त्यात सबटायटल, क्जोज कॅप्शनिंग आणि हिंदीत ऑडिओ डिस्क्रिप्शन द्यायला सांगितले आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मवर श्रवण आणि दृष्टिबाधित लोकांना चित्रपटाचा आनंद घेता येईल, यासाठी हे बदल सुचवण्यात आले आहेत. हे बदल केल्यानंतर कोर्टाने YRF ला पुन्हा सर्टिफिकेशनसाठी हा चित्रपट सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनकडे सुपूर्द करण्यास सांगितलं आहे.
सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘पठाण’ या चित्रपटात शाहरुख खानसह दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या 25 जानेवारी रोजी हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे.
बार अँड बेंचने दिलेल्या माहितीनुसार, कोर्टाने निर्मात्यांना 20 फेब्रुवारीपर्यंत सर्व तपशील सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच सीबीएफसीला 10 मार्चपर्यंत निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. हे सर्व निर्देश ओटीटीवर चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वीचे आहेत. थिएटरमध्ये ‘पठाण’ प्रदर्शित करण्याबाबत कोर्टाने अद्याप कोणतेही निर्देश दिले नाहीत.
एप्रिल महिन्यात ‘पठाण’ हा चित्रपट ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. तोपर्यंत निर्माते हे अपेक्षित बदल करू शकतात, असं कोर्टाने नमूद केलं आहे. ‘पठाण’च्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला. यामध्ये शाहरुख, दीपिका आणि जॉन जबरदस्त ॲक्शन अंदाजात दिसले.
सेन्सॉर बोर्डाच्या समितीने ‘पठाण’च्या निर्मात्यांना चित्रपटात 10 पेक्षा अधिक बदल सुचवले आहेत. यात पठाणमधील वादग्रस्त ठरलेल्या ‘बेशरम रंग’ या गाण्याचाही समावेश आहे. चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होण्याआधी हे बदल केलेला व्हर्जन समितीकडे सुपूर्द करण्याचीही सूचना देण्यात आली आहे.