Pathaan | ‘पठाण’च्या ओटीटी व्हर्जनमध्ये मोठा बदल; दाखवणार थिएटरमध्ये कापलेला शाहरुखचा खास सीन
पठाणच्या प्रदर्शनापूर्वी या चित्रपटातील मुख्य कलाकारांनी कोणत्याच माधम्यांना मुलाखत दिली नव्हती किंवा कोणत्याही शोमध्ये त्यांनी हजेरी लावली नव्हती. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर शाहरुखने शनिवारी ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला.
मुंबई : बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानने जवळपास चार वर्षांनंतर ‘पठाण’ या चित्रपटातून कमबॅक केलं. या चित्रपटाविषयी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. याच उत्सुकतेमुळे पठाणने बॉक्स ऑफिसवरील सर्व विक्रम मोडले आहेत. पठाण हा भारतातील सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला आहे. शाहरुख खानच्या चित्रपटावरील हे खास प्रेम होळीनिमित्तही पहायला मिळालं. ‘पठाण’ हा पहिला असा बॉलिवूड चित्रपट ठरला आहे, ज्याने सहाव्या आठवड्यात पाचव्यापेक्षाही अधिक कमाई केली आहे.
होळीनिमित्त नवा विक्रम
पाचव्या वीकेंडला पठाणने 5.50 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर सहाव्या वीकेंडमध्ये पठाणने 5.82 कोटी रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटाची क्रेझ पाहता त्याचं लाइफटाइम कलेक्शन 550 कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. एकीकडे पठाणची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई सुरू असताना, दुसरीकडे या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची चर्चा सुरू झाली आहे.
ओटीटी व्हर्जन असेल खास
निर्मात्यांकडून अद्याप पठाणच्या ओटीटी प्रदर्शनाविषयी कोणतीच अधिकृत घोषणा झाली नाही. मात्र हा चित्रपट ॲमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. येत्या 24 एप्रिलपर्यंत म्हणजेच थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्याच्या तीन महिन्यांनंतर हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होऊ शकतो, असं म्हटलं जातंय. आता पठाणचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी अशी माहिती दिली आहे की थिएटरमध्ये चित्रपट पाहिलेल्या प्रेक्षकांनाही ओटीटीवर पठाण पहायला नक्कीच आवडेल. कारण त्याच्या थिएटरच्या व्हर्जनमधून कट करण्यात आलेले सीन्स ओटीटी व्हर्जनमध्ये तसेच ठेवण्यात आले आहेत.
सिद्धार्थ आनंदने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत असं सांगितलं की, पठाणचा ओटीटी व्हर्जन हा थिएटर व्हर्जनपेक्षा मोठा असेल. ओटीटीवर चित्रपटातील कापण्यात आलेले सीन्ससुद्धा दाखवण्याची शक्यता आहे. “मी माझ्या लेखकांसोबत प्रत्येक गोष्टीबद्दल मोकळेपणे चर्चा करतो. पठाणच्या बालपणाविषयीचा किस्सा खूप मजेशीर आहे. त्याचं कोणतंच नाव नाही आणि तो एका थिएटरमध्ये भेटला होता. ज्याचं खरं नाव नवरंग असं होतं आणि नंतर तो पठाण कसा होतो, याची कथा कदाचित तुम्हाला ओटीटी व्हर्जनमध्ये पहायला मिळेल”, असं त्यांनी सांगितलं.