धाप लागली, घाम फुटला… तिरुपतीच्या दर्शनाला जाताना पवन कल्याण यांची झाली अशी अवस्था
आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण हे मंगळवारी रात्री तिरुपती बालाजींच्या दर्शनासाठी निघाले होते. मंदिराच्या 3500 हून अधिक पायऱ्या चढताना त्यांची प्रचंड दमछाक झाली होती. त्यांची ही अवस्था पाहून चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे.
आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि अभिनेते पवन कल्याण यांनी तिरुपती मंदिरात बालाजींचं दर्शन घेतलं. गेल्या काही दिवसांपासून तिरुपती मंदिरात दिल्या जाणाऱ्या लाडूच्या प्रसादावरून खूप मोठा वाद सुरू आहे. मंदिरात प्रसाद म्हणून मिळणाऱ्या लाडूमध्ये प्राण्यांच्या चरबीच्या कथित भेसळीच्या वादानंतर पवन कल्याण यांनी 11 दिवसांची प्रायश्चित्त दीक्षा (शुद्धीकरण विधी) पूर्ण केली. त्यानंतर ते मुलीसोबत दर्शनाला पोहोचले. मंदिराच्या पायऱ्या चढताना पवन कल्याण यांना श्वास घेण्यात बराच त्रास जाणवत होता. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ते त्यांच्या टीमसोबत मंदिराच्या पायऱ्या चढताना दिसत आहेत. पायऱ्या चढताना धाप लागल्याने ते एका जागी थांबले आणि बसले. त्यांना बराच घामसुद्धा आला होता आणि त्यांना श्वास घेताना अडचण जाणवत होती. हा व्हिडीओ व्हायरल होताच त्यांच्या प्रकृतीबाबत चाहत्यांनी काळजी व्यक्त केली.
मिळालेल्या माहितीनुसार, पवन कल्याण यांना अस्थमा आणि कंबरेच्या दुखण्याचा त्रास आहे. अशातच ते 3500 पेक्षाही जास्त पायऱ्या अनवाणी चढून देवदर्शनाला पोहोचले होते. पवन कल्याण हे मंगळवारी रात्री तिरुमला मंदिरात पोहोचले आणि रात्रभर त्यांनी यात्रा करून बालाजींचं दर्शन घेतलं. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये त्यांच्या टीमचे सदस्य त्यांना मदत करताना दिसत आहेत.
. @PawanKalyan is suffering from Asthma and Back pain
Can’t see him like this ♥️😭 pic.twitter.com/mRq5i986Yx
— Pawanism™ (@santhu_msd7) October 1, 2024
Asthma and severe back pain🥲
May Lord Venkateshwara be with you, @PawanKalyan. pic.twitter.com/JHTYp5z363
— 𝐑𝐨𝐜𝐤𝐲 𝐒𝐫𝐞𝐞 𝐏𝐬𝐩𝐤 (@SreeH2357) October 1, 2024
अकरा दिवसांपूर्वी तिरुपतीच्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबीची भेसळ असल्याचं उघड झालं होतं. त्यानंतर पवन कल्याण यांनी या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला होता. भेसळयुक्त प्रसाद खाल्ल्यामुळे त्यांनी शुद्धीकरणाची विधी सुरू केली. विजयवाडा इथल्या श्री दुर्गा मल्लेश्वर स्वामी वरला देवस्थानम इथं यांनी शुद्धीकरणाची विधी सुरू केली. लाडूच्या वादानंतर पवन कल्याण यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट लिहित नाराजी व्यक्त केली होती. ‘आपली संस्कृती, श्रद्धा आणि भक्तीचं केंद्र असलेल्या तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादात अशुद्धता पसरवण्याच्या या प्रयत्नांमुळे मी वैयक्तिक पातळीवर खूप दुखावला गेलोय. मला माझी फसवणूक झाल्यासारखं वाटतंय’, असं त्यांनी लिहिलं होतं.