अखेर वादानंतर ‘या’ तारखेला प्रदर्शित होणार ‘फुले’
गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटावरून मोठा वाद सुरू होता. ब्राह्मण महासंघाने आधी विरोध केला, त्यानंतर सेन्सॉर बोर्डानेही त्यात काही सुधारणा सुचवल्या होत्या. यानंतर वंचित बहुजन आघाडीकडून आंदोलनही करण्यात आलं होतं.

ब्राह्मण महासंघाचा विरोध आणि सेन्सॉर बोर्डाने सुचवलेल्या सुधारणा.. या सर्व वादानंतर अखेर ‘फुले’ हा चित्रपट येत्या 25 एप्रिल रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं स्त्री शिक्षण, जातिनिर्मूलन आणि सामाजिक परिवर्तनासाठीचं कार्य या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. सामाजिक समतेसाठी लढणाऱ्या या क्रांतिकारी दाम्पत्याच्या प्रेरणादायी जीवनकहाणीला रूपेरी पडद्यावर मांडण्याचा हा प्रयत्न आहे, जो आजच्या पिढीला इतिहासाची जाणीव करून देतानाच नव्या विचारांची दारं उघडणारा ठरणार आहे. हा चित्रपट आधी 11 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते अनंत महादेवन यांनी या चित्रपटाचं प्रभावी दिग्दर्शन केलं आहे. ज्योतिबा फुले यांच्या भूमिकेत ‘स्कॅम 1992’ फेम प्रतीक गांधी आणि सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत अभिनेत्री पत्रलेखा झळकणार आहेत. त्यांच्या अभिनयातून या ऐतिहासिक व्यक्तिरेखांना नवी ऊर्जा मिळाल्याचं ट्रेलरवरून स्पष्ट होतं. ‘फुले’ हा चित्रपट केवळ ऐतिहासिक घटनांचा मागोवा घेत नाही, तर त्यामागची तत्त्वं, मूल्यं आणि सामाजिक चळवळींचं महत्त्व अधोरेखित करतो. त्यामुळे तो केवळ चित्रपट न राहता, एक सांस्कृतिक आणि वैचारिक अनुभव ठरेल, असं म्हटलं जातंय.




“मी दुसऱ्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होतो, तेव्हा मला समजलं की या चित्रपटाचं प्रदर्शन दोन आठवड्यांनी पुढे ढकलण्यात आलं आहे. हे ऐकून मी निराश झालो. नंतर जेव्हा निर्मात्यांशी माझं बोलणं झालं तेव्हा मला त्यामागचं कारण समजलं. ही काही अशी कारणं होती ज्यावर तुमचं काहीच नियंत्रण नसतं. मी निराश होण्यामागे सर्वांत मोठं कारण असं होतं की 11 एप्रिल रोजी ज्योतिराव फुले यांची जयंती होती. त्याच दिवशी हा चित्रपट प्रदर्शित झाला असता तर तो इतिहासाचा एक भाग बनू शकला असता. ती तारीख खूप महत्त्वाची होती. पण शेवटी जे होतं ते चांगल्यासाठी होतं”, अशी प्रतिक्रिया प्रतीक गांधीने दिली.
View this post on Instagram
या चित्रपटाच्या दृश्यात्मक आणि तांत्रिक मांडणीला सशक्त आकार देणाऱ्या क्रिएटिव्ह टीममध्ये अनेक अनुभवी कलाकार सहभागी आहेत. सिनेमॅटोग्राफर म्हणून सुनीता राडिया यांनी प्रभावी चित्रभाषा वापरली आहे. वेशभूषा डिझायनर अपर्णा शाह यांनी ब्रिटिशकालीन भारतातील वास्तव आणि फुल्यांच्या सामाजिक स्तराचं सूक्ष्म दर्शन घडवलं आहे. प्रॉडक्शन डिझायनर म्हणून संतोष फुटाणे यांनी काळाला साजेशी पार्श्वभूमी उभी केली असून, सिंक साऊंडची जबाबदारी राशी बुट्टे यांनी सांभाळली आहे.
संतोष गायके यांनी मेकअप आणि हेअर डिझाइनच्या माध्यमातून पात्रांना अधिक वास्तविक बनवलं आहे. संगीतकार जोडी रोहन-रोहन यांचे पार्श्वसंगीत आणि गीतसंगीत कथानकात भावनात्मक गहिराई निर्माण करतं. रौनक फडणीस यांनी आपल्या संकलनातून कथेला गतिमान ठेवताना प्रसंगांची परिणामकारक मांडणी केली आहे. तर पोस्ट प्रोड्युसर म्हणून कुणाल श्रीकृष्ण तारकर यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.