‘त्यांच्यासोबत झालेल्या भेटी, चर्चा..’; नरेंद्र मोदींचं मनोज कुमार यांच्या पत्नींना पत्र
मनोज कुमार यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी शशि गोस्वामी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्र लिहिलं आहे. या पत्राद्वारे त्यांनी दिग्गज अभिनेत्याला श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांचं जाणं हे सिनेसृष्टीसाठी कधीही भरून न निघणारं नुकसान आहे, असं त्यांनी या पत्रात लिहिलंय.

बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते मनोज कुमार यांचं शुक्रवारी (4 मार्च) निधन झालं. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनोज कुमार यांनी त्यांच्या देशभक्तिपर चित्रपटांद्वारे स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांचे चाहते त्यांना ‘भारत कुमार’ म्हणून ओळखायचे. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीत एक पोकळी निर्माण झाली आहे. मनोज कुमार यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पत्नीला पत्र लिहिलं आहे. या पत्राद्वारे मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याचप्रमाणे मनोज कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मनोज कुमार यांच्या पत्नींना पत्र-
‘श्रीमती शशि गोस्वामीजी, मनोज कुमार यांच्या निधनाने अत्यंत दु:ख झालं. या कठीण काळात माझ्या संवदेना कुटुंबीय आणि शुभचिंतकांसोबत आहे. दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांनी आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून भारताच्या गौरवाला प्रभावशाली पद्धतीने दाखवलं. त्यांच्या अनेक चित्रपटांनी देशवासियांमध्ये देशभक्तीची भावना आणखी मजबूत करण्यात मोलाचं योगदान दिलं. भारताच्या महत्त्वाकांक्षी युवाच्या रुपात त्यांच्या विविध भूमिकांनी एकीकडे देशाच्या स्वातंत्र्याच्या संघर्षाला जिवंत केलं, तर दुसरीकडे देशाचं भविष्य आणखी चांगलं बनवण्यासाठी लोकांना प्रोत्साहनसुद्धा दिलं. समाजाप्रती असलेल्या आपल्या जबाबदारीला कलात्मक रुपात व्यक्त करत त्यांनी चित्रपटसृष्टीला सातत्याने समृद्ध केलं. भारतीय संस्कृती आणि मूल्यांवर आधारित त्यांच्या चित्रपटांमधील अनेक गाणी देशाप्रती असलेलं प्रेम आणि समर्पणाच्या भावनेला व्यक्त करतात. ही गाणी लोक सदैव गुणगुणत राहतील’, असं त्यांनी लिहिलंय.
‘मनोज कुमार यांच्यासोबत झालेल्या भेटी आणि विचारपूर्ण चर्चा मला सदैव लक्षात राहील. त्याचं कार्य आपल्या पिढ्यांना देश आणि समाजासाठी कार्य करण्यासाठी सतत प्रेरणा देईल. त्यांचं जाणं हे सिनेसृष्टीसाठी कधीही भरून न निघणारं नुकसान आहे’, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.




1999 मध्ये प्रदर्शित झालेला ‘मैदान ए जंग’ हा मनोज कुमार यांची भूमिका असलेला अखेरचा चित्रपट ठरला. 1992 साली त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर 2015 मध्ये त्यांना प्रतिष्ठित अशा दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.