लग्न कधी करणार? नातेवाईकांच्या प्रश्नांना वैतागून पूजा भट्टने दिलं सडतोड उत्तर
बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सिझनमध्ये ती तिच्या लग्न आणि घटस्फोटाविषयीही व्यक्त झाली होती. मुंबईत रेस्टॉरंटचा व्यवसाय करणाऱ्या मनिष मखिजाशी तिने लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या 11 वर्षांनंतर 2014 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. त्यावेळी तिचं नाव अभिनेता रणवीर शौरीशी जोडलं गेलं होतं.
लग्न कधी करणार?.. वयाची पंचविशी ओलांडल्यानंतर प्रत्येक नातेवाईक घरी येताना एकवेळ हातात मिठाईचा डब्बा आणो ना आणो पण हा प्रश्न आवर्जून सोबत घेऊन येतात. हा प्रश्न ऐकताच प्रत्येक मुलीच्या किंवा मुलाच्या डोक्यात एकच डायलॉग येतो, तो म्हणजे “अतिथी, तुम कब जाओगे?” हे फक्त सर्वसामान्यांसोबतच नाही तर सेलिब्रिटींसोबतही घडतं. प्रत्येक मुलीला तिच्या आयुष्यात एकदा तरी अशा परिस्थितीला सामोरं जावं लागतं. मग ती मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी का असेना किंवा मोठी सेलिब्रिटी का असेना. अशाच प्रश्नांना अभिनेत्री आलिया भट्टची बहीण आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांची मुलगी पूजा भट्ट वैतागली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत 52 वर्षीय पूजाने आपलं हेच दु:ख मांडलं आहे.
“मला नेहमी विचारलं जातं, तू अजून लग्न का नाही केलंस? तू सिंगल का आहेस? तू इतकं छान आयुष्य जगतेस. तू आकर्षक महिला आहेस. एखाद्या मुलाशी आम्ही तुझी ओळख करून देतो. हे सर्व प्रश्न ऐकल्यानंतर माझं एकच उत्तर असतं की, बॉस.. मला वाचवण्यासाठी कोणाची गरज नाही. काही लोक माझ्याजवळ येतात आणि म्हणतात की लग्न कर. त्यांच्या या म्हणण्यावर माझा सवाल असतो की, अरे का करू मी लग्न? त्यांना मला कोणाशी तरी भेट करून द्यायचं असतं. पण मला कोणालाही भेटायचं नाहीये. मी मॅचमेकर शोधत नाहीये”, असं पूजा म्हणाली.
View this post on Instagram
लग्नाविषयी आपला निर्णय सांगताना पूजा पुढे म्हणाली, “माझं जेव्हा लग्न व्हायचं असेल तेव्हा होईल. जेव्हा एखादी व्यक्ती भेटायची असेल तेव्हा ती मला भेटेल. फक्त एक पुरुष हा प्रत्येक गोष्टीचं समाधान असू शकत नाही. आपण स्वत:च स्वत:ला सावरलं पाहिजे. एक लाइफ पार्टनर शोधण्यापेक्षा उत्तम पर्याय म्हणजे कम्पॅनियन (मित्रासारखा जोडीदार) भेटणं. जर मला असा एखादा कम्पॅनियन भेटला तर माझ्यासाठी ते सर्वोत्तम असेल. जरी तो नाही भेटला तरी माझ्या आयुष्यात इतर खास लोकं आहेत, ज्यांच्यासोबत मी खुश आहे. माझे वडील आहेत, कुटुंबीय आहेत, माझ्या मित्रमैत्रिणी आहेत. माझं काम उत्तम चाललंय. माझं आयुष्य खूप सुंदर आहे. केवळ मी सिंगल असल्याने माझं आयुष्य अपूर्ण नाही.”