भीषण अपघातात प्रसिद्ध अभिनेत्रीसह नऊ जणांचा जागीच मृत्यू; गायकाचाही गेला जीव
बिहारमधील कैमूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात नऊ जणांचा जागीत मृत्यू झाला आहे. या नऊ जणांमध्ये प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री आंचल तिवारी आणि भोजपुरी गायक छोटू पांडे यांचाही समावेश आहे.
बिहार : 27 फेब्रुवारी 2024 | बिहारच्या कैमूर जिल्ह्यात रविवारी संध्याकाळी उशिरा अत्यंत भीषण अपघात झाला. या अपघातात भोजपुरी इंडस्ट्रीतील चार लोकप्रिय कलाकारांचा मृत्यू झाला. राष्ट्रीय महामार्गावरील मोहनिया याठिकाणी हा अपघात झाला. भोजपुरी गायक छोटू पांडेची कार एका दुचाकीस्वाराला वाचवताना उलटली. जेव्हा गाडीतून पूर्ण टीम बाहेर निघण्याचा प्रयत्न करत होती, तेव्हाच मागून येणाऱ्या एका ट्रकने भोजपुरी गायकाच्या संपूर्ण टीमला आणि दुचाकीस्वाराला चिरडलं. या अत्यंत भयानक अपघातात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला.
भीषण अपघातात 9 जणांचा जागीच मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार भोजपुरी गायक छोटू पांडे हा त्याच्या संपूर्ण टीमसोबत उत्तरप्रदेशला एका कार्यक्रमासाठी जात होता. यावेळी त्यांच्या गाडीचा हा भीषण अपघात झाला आणि त्यात दोन अभिनेत्रींसह नऊ जणांचा मृत्यू झाला. कैमूरमधील राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला. प्रसिद्ध भोजपुरी अभिनेता आणि गायक पुण्यश्लोक छोटू पांडे आणि अभिनेत्री सिमरन श्रीवास्तव हे नऊ जणांच्या टीमसह मांगलिक कार्यक्रमात गायनासाठी जात होते. हा कार्यक्रम उत्तरप्रदेशमध्ये होणार होता.
भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीवर शोककळा
कैमूरमधील राष्ट्रीय महामार्गावर मोहनियाजवळ एका दुचाकीस्वाराला वाचवताना त्यांची कार उलटली. त्यानंतर कारमधून बाहेर निघत असताना मागून आलेल्या ट्रकने सर्वांना चिरडलं. या घटनेनंतर भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये बक्सर इथले भोजपुरी गायक छोटू पांडे, त्यांचा भाचा अनु पांडे, गीतकार सत्यप्रकाश मिश्रा बैरागी, वाराणसीमधील अभिनेत्री सिमरन श्रीवास्तव आणि आंचल तिवारी यांचा समावेश आहे. हे सर्वजण भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरे होते.
ट्रकचालक फरार
या अपघातानंतर एनएच 2 वर गाड्यांची मोठी रांग लागली होती. घटनास्थळी तातडीने पोलीस आणि मदतकार्य पोहोचवण्यात आलं. मृतदेहांना शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी मृतांच्या नातेवाईकांनाही याबद्दलची माहिती दिली आहे. या अपघातानंतर ट्रकचालक तिथून फरार झाल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.