Prabhas | प्रभासच्या मेणाच्या पुतळ्यावर वाद; ‘बाहुबली’च्या निर्मात्यांकडून कारवाईचा इशारा
साऊथ सुपरस्टार प्रभासच्या मेणाच्या पुतळ्यावरून नवा वाद सुरू झाला आहे. हा पुतळा कर्नाटकातील मैसूर इथल्या एका संग्रहालयात असून त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो शेअर करत बाहुबली चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
मैसूर | 26 सप्टेंबर 2023 : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता प्रभास याचा 2017 मध्ये बँकॉकमधील ‘मादाम तुसाद’ संग्रहालयात मेणाचा पुतळा तयार करण्यात आला होता. या नामांकित संग्रहालयात मेणाचा पुतळा बनवण्यात आलेला प्रभास हा पहिलाच दाक्षिणात्य अभिनेता ठरला होता. हुबेहूब प्रभाससारख्या दिसणाऱ्या या मेणाच्या पुतळ्याचे फोटो त्यावेळी सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. आता प्रभासचा आणखी एक पुतळा चर्चेत आला आहे. मात्र या पुतळ्यावर ‘बाहुबली’च्या निर्मात्यांनी थेट आक्षेप घेतला आहे. कर्नाटकातील मैसूर इथल्या एका संग्रहालयात प्रभासचा हा पुतळा उभारण्यात आला आहे.
बाहुबली चित्रपटाच्या निर्मात्यांची प्रतिक्रिया
बाहुबली या चित्रपटाचे निर्माते शोबू यार्लागड्डा यांनी प्रभासच्या पुतळ्याचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्याचसोबत त्यांनी असं स्पष्ट केलंय की संबंधित पुतळा तयार करण्याबाबत निर्मात्यांकडून किंवा टीमकडून कोणतीच परवानगी घेण्यात आली नव्हती. निर्मात्यांनी ट्विटरवर लिहिलं, ‘हे अधिकृत परवानाकृत काम नाही. आमच्या कोणत्याही परवानगीशिवाय आणि माहितीशिवाय हा पुतळा तयार करण्यात आला आहे. आम्ही हा पुतळा तिथून काढण्यासाठी तातडीने कारवाई करणार आहोत.’
This not an officially licensed work and was done without our permission or knowledge. We will be taking immediate steps to get this removed. https://t.co/1SDRXdgdpi
— Shobu Yarlagadda (@Shobu_) September 25, 2023
नेटकऱ्यांनीही प्रभासच्या या पुतळ्यावर आक्षेप घेतला. तो पुतळा केवळ ‘बाहुबली’ या भूमिकेच्या कपड्यांमुळेच बाहुबली वाटतोय. मात्र त्याचा चेहरा प्रभासशी अजिबात मिळताजुळता नसल्याचं निरीक्षण अनेकांनी नोंदवलं. काहींनी तो पुतळा परेफक्ट वाटत नसला तरी तो प्रभासचा असल्याने खास असल्याचं म्हटलं आहे. ‘हा पुतळा प्रभाससारखा कमी आणि रामचरणसारखा अधिक वाटतोय’, असंही नेटकऱ्यांनी लिहिलं आहे. काहींनी पुतळ्याची तुलना ऑस्ट्रेलियन क्रिकेटर डेव्हिड वॉर्नरशीही केली आहे.
‘बाहुबली’ या चित्रपटाचं दिग्दर्शन एस. एस. राजामौली यांनी केलं. 2015 मध्ये या चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. त्यानंतर 2017 मध्ये ‘बाहुबली: द कन्क्लुजन’ हा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यानंतर मादाम तुसादमध्ये प्रभासचा मेणाचा पुतळा तयार करण्यात आला होता. बाहुबली या चित्रपटामुळे प्रभासच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली होती.