नितीन गडकरींच्या भेटीनंतर प्राजक्ता माळीच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव; नेटकरी म्हणाले ‘तुला राजकारणात..’
अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या दमदार अभिनयासोबतच विविध कारणांमुळे सतत सोशल मीडियावर चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून तिने राजकारणातील बऱ्याच व्यक्तीमत्त्वांची भेट घेतली. त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्यावरील कमेंट्स एकदा पहाच!
नागपूर : 27 ऑक्टोबर 2023 | अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकतीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. प्राजक्ताच्या या फोटोंवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. नागपुरातील एका कार्यक्रमानिमित्त प्राजक्ता आणि नितीन गडकरी एकाच मंचावर उपस्थित राहणार होते. मात्र हा योग काही कारणास्तव जुळून आला नाही. अखेर प्राजक्ताने आयोजकांना विनंती करून गडकरींची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. ही भेट कशी झाली, यादरम्यान कोणत्या विषयांवर त्यांनी गप्पा मारल्या आणि तिथून निघताना गडकरींनी कोणती भेट दिली, याविषयी तिने कॅप्शनमध्ये सविस्तर लिहिलं आहे.
प्राजक्ता माळीची पोस्ट-
‘मी आणि केंद्रीय मंत्री नितीनजी नागपुरात एका कार्यक्रमानिमित्त एका मंचावर उपस्थित राहण्याचा योग जुळून येता येता राहिला. आयोजकांना म्हटलं सहज शक्य झालं तर मला त्यांना भेटायला खूप आवडेल आणि नितीनजींनी तात्काळ वेळ दिला. नवमीला नितीनजींच्या निवासस्थानी ही ‘ग्रेट भेट’ झाली. त्यामुळे सबंध परिवारालाही भेटता आलं,’ असं प्राजक्ताने लिहिलं. या भेटीदरम्यान महाराष्ट्राची हास्यजत्रा, प्राजक्ताचे आगामी प्रोजेक्ट्स, श्री श्री रविशंकरजी, प्राजक्तराज, समृद्धी महामार्ग अशा अनेक विषयांवर दोघांनी अर्ध्या तासाहून अधिक वेळ गप्पा मारल्या.
श्री श्रींचं माझ्यावर पुत्रवत प्रेम आहे आणि आम्ही तुमची हास्यजत्रा रोज बघतो, हे ऐकून विशेष आनंद झाल्याचं प्राजक्ताने पुढे लिहिलं. निघताना गडकरींनी प्राजक्ताला त्यांच्या घरच्या देवीचं दर्शन घ्यायला लावलं. त्यांच्या कामावर लिहिली गेलेली आठ-नऊ पुस्तकं त्यांनी तिला दिली. इतकंच नव्हे तर नैसर्गिक कापसापासून बनवलेली खादी साडी त्यांनी प्राजक्ताला भेट म्हणून दिली. ही साडी लगेच दुसऱ्या दिवशी विजयादशमी उत्सवात नेसल्याचंही तिने सांगितलं. ‘आयुष्यभर स्मरणात राहील अशा या भेटीसाठी वेळ दिल्याबद्दल नितीनजींचे मनापासून आभार,’ अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या आहेत.
View this post on Instagram
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
प्राजक्ताच्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. ‘भारतीय राजकारणातील सर्वांत मोठ्या व्यक्तीची भेट घेतलीस’, असं एकाने लिहिलं. तर ‘तुला राजकारणात पाहण्याची आशा आहे आणि ते चालू ठेव’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘लोकसभा निवडणुकीत उभी राहा. आपल्यासारख्या लोकांची गरज आहे. राजकारणात राजकीय नेते काही कामाचे राहिले नाहीत. इथून पुढे कलाकार, शेतकरी, सामाजिक जाणीव असलेले लोक यायला पाहिजेत’, असा सल्ला एका नेटकऱ्याने दिला. अभिनेते जयवंत वाडकर यांनीसुद्धा फोटोंवर कमेंट करत ‘ग्रेट भेट’ असं लिहिलं आहे.