‘कदाचित तुझा हाच स्वभाव..’; बिग बॉस मराठी विजेता सूरजसाठी प्राजक्ता माळीची पोस्ट
सूरज चव्हाणने बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनचं विजेतेपद पटकावलं आहे. अंतिम फेरीत त्याने निक्की तांबोळी आणि अभिजीत सावंत यांसारख्या तगड्या कलाकारांना मात दिली. सूरजच्या या विजयावर प्राजक्ता माळी आणि प्रवीण तरडे यांनी पोस्ट लिहित शुभेच्छा दिल्या आहेत.
बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन अखेर रविवारी संपुष्टात आला. 70 दिवस बिग बॉसच्या घरात राहिल्यानंतर निक्की तांबोळी, अभिजीत सावंत आणि सूरज चव्हाण हे तीन जण अंतिम फेरीपर्यंत पोहोचले होते. या तिघांपैकी अतिशय गरीब कुटुंबातून, खेडेगावातून आलेल्या सूरज चव्हाणने बिग बॉस मराठीची ट्रॉफी पटकावली. सूरजच्या या विजयावर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अनेक मराठी कलाकारांनी सूरजसाठी पोस्ट लिहिली आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनीसुद्धा सोशल मीडियावर पोस्ट लिहित सूरजला शुभेच्छा दिल्या आहेत.
प्राजक्ता माळीची पोस्ट-
‘खूप खूप अभिनंदन सूरज! तुझ्यातला प्रामाणिकपणा आणि जिद्द बिग बॉसच्या घरात तुला भेटल्यावर अगदी स्पष्टपणे जाणवली होती. कदाचित तुझा हाच स्वभाव महाराष्ट्राला भावला. महाराष्ट्राच्या मनात तू स्थान मिळवण्यात यशस्वी ठरलास आणि बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीवर नाव कोरलंस! पुन्हा एकदा खूप खूप, तुझ्या भाषेत झापुक झुपुक अभिनंदन,’ अशी पोस्ट प्राजक्ता माळीने लिहिली आहे.
View this post on Instagram
प्रवीण तरडेची पोस्ट-
‘सूरज मित्रा तु फक्त ट्रॅाफी नाही तर सगळ्यांची मनंसुद्धा जिंकलीस. साधेपणा, सच्चेपणा कायम येक नंबरच राहतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालं,’ अशा शब्दांत त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
‘बिग बॉस मराठी 5’मध्ये गायक अभिजीत सावंत दुसऱ्या क्रमांकावर होता, तर निक्की तांबोळी तिसऱ्या स्थानी राहिली. धनंजय पोवार चौथ्या क्रमांकावर आणि अंकिता वालावलकर पाचव्या स्थानी होती. बिग बॉसच्या ट्रॉफीसोबतच विजेता सूरज चव्हाणला 14.6 लाख रुपये कॅश प्राइज मिळाली. इतकंच नव्हे तर त्याला 10 लाख रुपयांचं ज्वेलरी वाऊचर आणि एक बाईकसुद्धा मिळाली.
प्राजक्ता माळी आणि प्रवीण तरडे यांनी केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. ‘अतिशय गरिब कुटुंबातून, हलाखीची परिस्थिती जगलेला, मंदिरातील नैवद्य नारळ खाऊन आयुष्य जगणारा गुलीगत सुरज चव्हाण हा यंदाच्या बिग बॉस मराठीचा विजेता ठरला. कधीही वाटलं नव्हतं हा तळागाळातील युवक या उंचीवर जाऊन महाराष्ट्रात स्वतःचं नाव मोठं करेल. यातून एक गोष्ट शिकायला मिळते. कुणालाही कमी समजायचं नसतं. प्रत्येक जण आपापल्या जागेवर बापच असतो. वेळ आल्यावर बरोबर प्रत्येकाचा इगो उतरवला जातो,’ असं नेटकऱ्यांनी म्हटलंय.