‘रानबाजार’ (RaanBaazar) या वेब सीरिजचा टीझर, ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा आहे. या सीरिजमध्ये पहिल्यांदाच अभिनेत्री प्राजक्ता माळीचे (Prajakta Mali) बोल्ड सीन्स (Bold Scenes) पहायला मिळत आहेत. काहींनी तिच्या या निर्णयाचं कौतुक केलं, तर काहींनी त्या बोल्ड दृश्यांवरून तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. आता यावर प्राजक्ताने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे. अभिजित पानसे दिग्दर्शित पॉलिटिकल क्राईम थ्रिलर असलेल्या या वेब सीरिजमध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत चेहरे पहायला मिळतात. सत्य घटनांच्या संदर्भांवर आधारित ही सीरिज असल्याचं म्हटलं जातंय. राजकारण, त्यातील धूर्त डावपेच, हनी ट्रॅप, उत्कंठा, नाट्यमय थरार हे सगळंच या सीरिजच्या ट्रेलरमध्ये पहायला मिळतं.
‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत प्राजक्ता म्हणाली, “मला असं वाटतं, बदल हा या जगाचा नियम आहे आणि प्रत्येकाने त्याला स्वीकारायला सुरुवात केली पाहिजे. भूमिकांच्या बाबतीत मी नेहमीच वेगवेगळे प्रयोग करण्याचा आणि प्रेक्षकांना काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न केला आहे आणि रानबाजारमध्ये बोल्ड सीन करणं ही त्यापैकीच एक गोष्ट आहे.”
बोल्ड सीनवरून ट्रोल करणाऱ्यांसाठी ती पुढे म्हणाली, “ट्रोल करणाऱ्यांनी आधी संपूर्ण सीरिज बघावी आणि त्यानंतर तशा दृश्यांसाठी मतं बनवावीत. ते फक्त बोल्ड सीन्स नाहीत, तर त्या सीरिजचा एक भाग आहेत. ठराविक कारणासाठी त्या दृश्यांचा त्यात समावेश केला गेला आहे. लोकांनी आधी विषय, कंटेंट पहावा आणि मग माझ्या बोल्ड सीन्सवर प्रतिक्रिया द्यावी.”
‘रानबाजार’ ही सीरिज आजपासून (20 मे) ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. यामध्ये तेजस्विनी आणि प्राजक्तासोबतच उर्मिला कोठारे, माधुरी पवार, सचिन खेडेकर, मोहन आगाशे, मकरंद अनासपुरे आणि अभिजीत पानसे यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.