Prakash Raj | ‘सिंघम’च्या जयकांत शिक्रेनं हिटलरशी केली पंतप्रधान मोदींची; फोटो शेअर करत म्हणाले..
पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना हिटलरशी करण्याची ही काही त्यांची पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी अशाच पद्धतीचे ट्विट केले होते. याआधी ट्विटरवर शेअर केलेल्या एका फोटोमध्ये नरेंद्र मोदी आणि दुसऱ्या फोटोमध्ये हिटलर हे वर्तमानपत्र वाचताना दिसत आहेत.
मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये दमदार भूमिका साकारणारे अभिनेते प्रकाश राज हे त्यांच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. सोशल मीडियावर सक्रिय असणारे प्रकाश राज अनेकदा सरकारवर निशाणा साधताना दिसतात. अभिनेत्यासोबतच ते एक राजकारणीसुद्धा आहेत. ट्विटरवर बऱ्याचदा ते पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आणि भाजपवर टीका करतात. आता नुकत्याच केलेल्या एका ट्विटमध्ये प्रकाश राज यांनी मोदींशी तुलना थेट हिटलरशी केली आहे. ‘सिंघम’ फेम प्रकाश राज यांनी पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधत एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये त्यांनी मोदींची तुलना हिटलरशी केली आहे. त्याचसोबत या देशाचं भविष्य धोक्यात असल्याचं म्हटलंय.
गेल्या काही दिवसांपासून देशात पहलवानांचा मुद्दा चर्चेत आहे. बृजभूषण शरण सिंहविरोधात ते निदर्शनं करत आहेत. हे प्रकरण प्रत्येक दिवशी वाढत जात आहे. विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्ती त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. काहीजण त्यांना पाठिंबा देत आहेत, तर काही जण त्यांना सल्ले देत आहेत. यादरम्यान प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
प्रकाश राज यांचं ट्विट
प्रकाश राज यांनी ट्विटरवर मोदींचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांच्यासमोर लहान मुलं दिसत आहेत. मुलं आणि मोदी यांच्यामध्ये एक काटेरी तार आहे. या फोटोसोबत प्रकाश राज यांनी हिटलरचाही फोटो पोस्ट केला आहे. हिटलरलाही अशाच प्रकारे पहायला मिळत आहे. हिटलरसमोर काही लहान मुलं आहेत आणि त्यांच्या मध्ये काटेरी तार आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं, ‘इतिहासाची पुनरावृत्ती होते.. भविष्य या काटेरी तारांच्या मागे आहे.. आताच सावध व्हा!’ प्रकाश राज यांच्या या ट्विटवरून भाजप समर्थकांनी जोरदार टीका केली आहे.
History repeats..Future is behind the Barbed wire .. BEWARE..ಇತಿಹಾಸ ಮರುಕಳಿಸುತ್ತಿದೆ .. ಭವಿಷ್ಯ ಮುಳ್ಳು ತಂತಿಯ ಹಿಂದಿದೆ . ಎಚ್ಚೆತ್ತುಕೊಳ್ಳಿ #justasking pic.twitter.com/5awaJs6ywe
— Prakash Raj (@prakashraaj) May 4, 2023
प्रकाश यांनी याआधीही हिटलरशी केली मोदींची तुलना
पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना हिटलरशी करण्याची ही काही त्यांची पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी अशाच पद्धतीचे ट्विट केले होते. याआधी ट्विटरवर शेअर केलेल्या एका फोटोमध्ये नरेंद्र मोदी आणि दुसऱ्या फोटोमध्ये हिटलर हे वर्तमानपत्र वाचताना दिसत आहेत. ‘पुन: अवतार.. हे कोणी केलं? फक्त विचारतोय’, असं कॅप्शन देत त्यांनी हे फोटो शेअर केले होते. प्रकाश राज यांच्या या ट्विटवरूनही मोठा वाद निर्माण झाला होता.