Chandrayaan 3 | ‘चांद्रयान 3’ मिशनची खिल्ली उडवल्याने ‘सिंघम’ फेम अभिनेता ट्रोल; फोटोवर भडकले नेटकरी
'चांद्रयानचं हे मिशन इस्रोचं आहे भाजपचं नाही. जर त्यात यश मिळालं तर ते यश भारताचं असेल कोणत्याही पक्षाचं नाही. हे मिशन अपयशी व्हावं अशी तुमची का इच्छा आहे? भाजप हा सत्ताधारी पक्ष आहे, तो एक ना एक दिवस जाईल. पण इस्रो वर्षानुवर्षे इथेच राहणार आहे', असं दुसऱ्याने म्हटलंय.
मुंबई | 21 ऑगस्ट 2023 : राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते प्रकाश राज हे नेहमी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे तर कधी ट्विट्समुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर येतात. सत्ताधारी पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात ते अनेकदा ट्विट करत असतात. रविवारी त्यांनी असंच एक ट्विट केलं असून त्यामुळे नेटकरी त्यांच्यावर खूप नाराज झाले आहेत. या ट्विटमध्ये त्यांनी इस्रोच्या चांद्रयान – 3 मिशनची खिल्ली उडवल्याचा आरोप नेटकरी करत आहेत. येत्या 23 ऑगस्टला संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी भारताचं स्पेसक्राफ्ट चंद्रभूमीला स्पर्श करेल. याच संदर्भातील एक हास्यास्पद फोटो त्यांनी शेअर केला आहे. हाच फोटो पाहून नेटकरी प्रकाश राज यांच्यावर संतापले आहेत.
शर्ट आणि लुंग घातलेल्या एका व्यक्तीचं कॅरिकेचर त्यांनी शेअर केलं आहे. या व्यक्तीच्या हातात दोन कप असून तो एका कपमधून दुसऱ्या कपमध्ये चहा ओततोय. या फोटोसोबत प्रकाश राज यांनी लिहिलं, ‘ब्रेकिंग न्यूज- चंद्रावरून विक्रम लँडरने पाठवलेला पहिला फोटो.. वॉव!’ हे ट्विट पाहून नेटकरी त्यांच्यावर चांगलेच भडकले आहेत. सत्ताधारी पक्षाला राजकीय टोले लगावताना इस्रोला बाजूला ठेवावं, असा सल्ला थेट नेटकऱ्यांनी त्यांना दिला आहे.
BREAKING NEWS:- First picture coming from the Moon by #VikramLander Wowww #justasking pic.twitter.com/RNy7zmSp3G
— Prakash Raj (@prakashraaj) August 20, 2023
‘जेव्हा तुम्ही एखाद्याचा द्वेष करता, तेव्हा ती गोष्ट नंतर पुढे इतकी वाढते की तुम्ही प्रत्येकाचा द्वेष करता. तुम्ही व्यक्ती, विचारधारा आणि राष्ट्राची कामगिरी यात फरक करणं विसरता. तुम्हाला सगळ्या गोष्टी सारख्याच दिसतात. तुमच्यासारख्या प्रतिभावान कलाकाराला असं वागताना पाहून वाईट वाटतंय’, अशा शब्दांत एका युजरने नाराजी व्यक्त केली. तर ‘चांद्रयानचं हे मिशन इस्रोचं आहे भाजपचं नाही. जर त्यात यश मिळालं तर ते यश भारताचं असेल कोणत्याही पक्षाचं नाही. हे मिशन अपयशी व्हावं अशी तुमची का इच्छा आहे? भाजप हा सत्ताधारी पक्ष आहे, तो एक ना एक दिवस जाईल. पण इस्रो वर्षानुवर्षे इथेच राहणार आहे’, असं दुसऱ्याने म्हटलंय.
भारताचं चांद्रयान 3 मिशनमधील लँडर अवतरणपूर्व कक्षेत पोहोचलं असून 23 तारखेला संध्याकाळी 6.04 वाजता ‘विक्रम’चं लँडिंग होईल. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान 3 चा विक्रम हा लँडर हा त्याच्या शेवटच्या कक्षेत यशस्वीरित्या स्थापित झाला असून आता 23 तारखेला त्याच्या उतरण्याची प्रतीक्षा आहे.