प्रतीक बब्बरने हटवलं वडिलांचं आडनाव; राज बब्बर यांच्याविषयी स्पष्ट म्हणाला “मला त्यांच्यासारखं..”
अभिनेता प्रतीक बब्बरने त्याच्या नावातून बब्बर हे आडनाव काढून टाकलं आहे. त्याऐवजी त्याने प्रतीक स्मिता पाटील असं नाव बदललंय. याविषयी तो नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाला.

अभिनेता प्रतीक बब्बरने काही दिवसांपूर्वी गर्लफ्रेंड आणि लिव्ह इन पार्टनर प्रिया बॅनर्जीशी लग्न केलं. मात्र या लग्नाला त्याने त्याचे वडील राज बब्बर यांनाच बोलावलं नव्हतं. यावरून अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. आता लग्नाच्या काही दिवसांनंतर प्रतीक आणि प्रियाने एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत ते कुटुंबातील काही गोष्टींबद्दल मोकळेपणे व्यक्त झाले. राज बब्बर हे नादिरा यांच्याशी विवाहित असताना स्मिता पाटील यांच्या प्रेमात पडले होते. या दोघांनी लग्न केलं. स्मिता पाटील यांनी प्रतीकला जन्म दिला, परंतु डिलिव्हरीच्या वेळी निर्माण झालेल्या गुंतागुंतमुळे त्यांना आपलं प्राण गमवावं लागलं. त्यानंतर राज पुन्हा त्यांची पहिली पत्नी नादिराकडे परत गेले.
लग्नाबद्दल सुरू असलेल्या चर्चांना तुमच्यावर काही परिणाम झाला का असा प्रश्न विचारला असता प्रतीकची पत्नी प्रिया म्हणाली, “आम्हाला काहीच फरक पडला नाही. कॅनडाहून माझे कुटुंबीय इथे आले होते. माझे जवळचे मित्रमैत्रिणी लग्नाला उपस्थित होते. आजी-आजोबांसोबतच ज्या काकींनी प्रतीकला लहानाचं मोठं केलं, ते सर्वजण लग्नात हजर होते. आमचं ज्यांच्यावर प्रेम होतं, ते सर्वजण तिथे होते. त्यामुळे जे काही झालं, त्यावर आम्ही काही प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही. कारण आमच्यासाठी ते महत्त्वाचं नाही.”




“सर्वकाही उघडपणे घडलंय, त्यामुळे काय घडलं या प्रश्नाला काही स्थान नाही. लोकांना परत भूतकाळात जाऊ द्या आणि एखाद्याच्या आयुष्यात काय घडलं ते समजून घेण्यासाठी जुने लेख वाचू द्या. मी आणि प्रतीकने फक्त आदर आणि प्रतिष्ठा यांमुळेच शांत राहण्याचा निर्णय घेतला आहे”, असं प्रिया पुढे म्हणाली.
View this post on Instagram
या मुलाखतीत प्रतीकला जेव्हा कदी त्याच्या वडिलांबद्दल किंवा कुटुंबीयांबद्दल प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा प्रियाने मधे पडून त्या प्रश्नावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला. “ते कुटुंब कधीच त्याच्यासाठी नव्हतं. ती व्यक्ती त्याच्या आयुष्यात कधीच नव्हती. त्यामुळे हा सवालच का केला जातोय, हे मला समजत नाही. आम्हाला आमचं आयुष्य जगायचं आहे. आमची बिलं दुसरं कोणी भरत नाही”, असं उत्तर प्रियाने दिलं.
प्रतीकविषयी बोलताना प्रिया पुढे म्हणाली, “एखाद्या मुलाच्या आयुष्याच्या सुरुवातीलाच आईची साथ सुटल्यावर काय होतं हे फारसे लोक समजत नाहीत ना? त्याच्याकडे लपवण्यासारखं काहीही नाही. त्याने कधीही काहीही लपवलं नाही, मग तो त्याचा भूतकाळ असो किंवा वर्तमान. तो योग्य वेळ आल्यावर या विषयावर बोलेल. त्याच्या आणि त्या कुटुंबातील परिस्थिती तो स्पष्ट करेल.”
प्रतीकने त्याचं ‘बब्बर’ हे आडनावसुद्धा काढून टाकलं आहे. त्याने आता स्वत:चं नाव प्रतीक स्मिता पाटील असं ठेवलंय. याविषयी त्याने सांगितलं, “मला परिणामांची काळजी नाही. मला फक्त हीच गोष्ट महत्त्वाची आहे की जेव्हा मी ते नाव ऐकतो, तेव्हा मला कसं वाटतं? मला पूर्णपणे माझ्या आईशी, तिच्या नावाशी आणि तिच्या वारसाशी पूर्णपणे जोडून राहायचं आहे. मी माझ्या वडिलांसारखं नाही तर माझ्या आईसारखं बनण्याचा प्रयत्न करतोय.”