‘पुष्पा 2’मधील आयटम साँगसाठी श्रीलीलाला मिळालं इतकं मानधन; समंथापेक्षा 60% कमी फी
अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता आहे. पहिल्या भागात समंथाने 'ऊ अंटावा' या आयटम साँगमध्ये जबरदस्त डान्स केला होता. आता दुसऱ्या भागात अभिनेत्री श्रीलीला आयटम साँगमध्ये झळकणार आहे.
अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असलेल्या ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाच्या सीक्वेलची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. ‘पुष्पा: द रूल’ येत्या डिसेंबर महिन्यात थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. पहिल्या भागातील अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना, फवाद फासिल यांच्या दमदार अभिनयासोबतच समंथा रुथ प्रभूचा आयटम साँग तुफान गाजला होता. ‘ऊ अंटावा’ हे गाणं आजही पार्ट्यांमध्ये वाजवलं जातं. समंथाच्या करिअरमधील हा पहिलाच आयटम साँग होता आणि त्याची जोरदार चर्चा झाली होती. या गाण्यासाठी समंथाने तब्बल पाच कोटी रुपये मानधन घेतल्याचं म्हटलं गेलं. आता दुसऱ्या भागातही प्रेक्षकांना एक आयटम साँग पहायला मिळणार आहे. मात्र यावेळी समंथा त्यात नसेल. तिची जागा प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीलीलाने घेतली आहे.
‘पुष्पा 1’मधील आयटम साँग करण्यास समंथाने सुरुवातीला नकार दिला होता. मात्र अल्लू अर्जुनने तिची मनधरणी केली आणि तिला तगडं मानधनसुद्धा दिलं होतं. पण आता श्रीलीलाला मात्र समंथाइतकं मानधन मिळालं नाही. ‘पुष्पा 2’मधील गाण्यासाठी तिला समंथापेक्षा 60 टक्क्यांनी कमी मानधन मिळाल्याचं कळतंय. श्रीलीलाने एका आयटम साँगसाठी दोन कोटी रुपये फी घेतल्याचं समजतंय.
View this post on Instagram
समंथाने नकार दिल्यानंतर या आयटम साँगची ऑफर अभिनेत्री श्रद्धा कपूरलाही दिल्याची चर्चा होती. त्यासाठी श्रद्धानेही पाच कोटी रुपये मानधन मागितलं होतं. मात्र निर्माते श्रद्धाला इतकी मोठी रक्कम देण्यास तयार नव्हते. अखेर श्रीलीलाने दोन कोटी रुपयांना ही ऑफर स्वीकारली. समंथा आणि श्रद्धाच्या तुलनेत श्रीलीलाची लोकप्रियता कमी आहे. त्यामुळे या गाण्याला प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळेल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. याआधी श्रीलीलाने ‘गुंटूर कारम’ या तेलुगू चित्रपटात महेश बाबूसोबत काम केलं होतं. या चित्रपटासाठी तिला चार कोटी रुपये फी मिळाली होती.
कोण आहे श्रीलीला?
अभिनेत्री श्रीलीलाचा जन्म मिशीगनमध्ये 2001 मध्ये झाला. लहानपणापासूनच तिने भरतनाट्यम शिकण्यास सुरुवात केली होती. बालकलाकार म्हणून तिने चित्रपटांमध्येही काम केलंय. 2019 मध्ये तिने ‘किस’ या कन्नड चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर 2021 मध्ये ती ‘पेल्ली संदडा’ या तेलुगू चित्रपटात झळकली होती. ‘धमाका’ या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा SIIMA पुरस्कार मिळाला.