अल्लू अर्जुन प्रकरणात मोठी अपडेट; आणखी एकाला अटक
संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरीप्रकरणी एकीकडे अभिनेता अल्लू अर्जुनची पोलिसांकडून मंगळवारी कसून चौकशी करण्यात आली. तर दुसरीकडे आता याप्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
हैदराबादच्या संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरीप्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. अभिनेता अल्लू अर्जुनचा बाऊन्सर अँथनी याला पोलिसांनी मंगळवारी अटक केली. 4 डिसेंबर रोजी संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा 2’ या चित्रपटाचा प्रीमिअर आयोजित करण्यात आला होता. यावेळी अचानक अल्लू अर्जुन तिथे आल्याने चाहत्यांनी एकच गर्दी केली. या गर्दीत चेंगराचेंगरी झाली आणि त्यात एका महिलेचा मृत्यू झाला. तर त्या महिलेच्या नऊ वर्षांच्या मुलाची प्रकृती गेल्या वीस दिवसांपासून गंभीर होती. वीस दिवसांनंतर त्याने प्रतिसाद दिला. अँथनवीर ‘पुष्पा 2’च्या प्रीमिअरसाठी बाऊन्सर्सची एक टीम आयोजित केल्याचा आणि चाहत्यांना थिएटरबाहेर धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे. यामुळे परिस्थिती आणखी चिघळली, असा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहे.
संध्या थिएटरबाहेर झालेल्या गोंधळात अँथनीची प्रमुख भूमिका असल्याचा संशय अधिकाऱ्यांना आहे. अँथनी हा अल्लू अर्जुनचा वैयक्तिक बाऊन्सर असून संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीला कारणीभूत असल्याच्या आरोपावरून त्याला मंगळवारी अटक करण्यात आली. याप्रकरणी संध्या थिएटरमधील धक्कादायक सीसीटीव्ही फुटेजसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी शेकडो चाहते एकाच वेळी थिएटरमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत असल्याचं या व्हिडीओत पहायला मिळत आहे. तर दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये अभिनेत्याचे बाऊन्सर्स चाहत्यांना ढकलताना, त्यांना धक्काबुक्की करताना दिसून येत आहेत.
Antony, the personal bouncer of actor Allu Arjun, was arrested yesterday for his alleged involvement in the stampede at Sandhya Theatre. Authorities suspect Antony played a pivotal role in the chaos during the actor’s visit.
Investigations are underway as more details emerge. pic.twitter.com/7M0zmhvL5b
— Informed Alerts (@InformedAlerts) December 24, 2024
35 वर्षी एम. रेवती यांचा थिएटरच्या याच चेंगराचेंगरीत मृत्यू झाला. तर त्यांच्या नऊ वर्षांच्या मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मंगळवारी अल्लू अर्जुनचीही पोलिसांनी तीन तासांहून अधिक वेळ चौकशी केली. यावेळी त्याला चेंगराचेंगरीचे व्हिडीओसुद्धा दाखवण्यात आले होते. यावेळी रेवती आणि त्यांच्या मुलाचे व्हिडीओ पाहून अल्लू अर्जुन भावूक झाल्याचं कळतंय. पोलिसांच्या चौकशीदरम्यान अल्लू अर्जुनला चेंगराचेंगरीच्या घटनेबद्दल बरेच प्रश्न विचारण्यात आले. चित्रपटाच्या टीमला संध्या थिएटरमध्ये जाण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली होती, हे तुला माहित होतं का, त्यानंतरही थिएटरला भेट देण्याचा निर्णय कोणाचा होता, पोलिसांनी तुला चेंगराचेंगरीबद्दलची माहिती दिली होती का, महिलेच्या मृत्यूबद्दल तुला कधी समजलं.. असे अनेक प्रश्न अल्लू अर्जुनला विचारले गेले.