राहत फतेह अली खानची जामिनावर सुटका, चौकशीत मोठी गोष्ट समोर
Rahat Fateh Ali Khan: दुबईत राहत फतेह अली खान अडकले वादाच्या भोवऱ्यात, पोलिसांनी चौकशीनंतर जामिनावर सोडलं, पण समोर आली मोठी गोष्ट, गायकाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे. सुटका झाल्यानंतर व्हिडीओ केलाय पोस्ट...
प्रसिद्ध आणि लोकप्रिय पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांचे माजी मॅनेजर सलमान अहमद यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर गायकाला अटक करण्यात आली होती. पण आता राहत फतेह अली खान यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. दरम्यान, अटकेची बातमी समोर आल्यानंतर राहत फतेह अली खान यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका… असं सांगितलं आहे. पण, दुबईत पोलिसांनी अटक करुन चौकशी केल्याचं सत्य राहत फतेह अली खान यांनी फेटाळलं नाही..
रिपोर्टनुसार, दुबई पोलिसांनी 13 जुलै 2024 मध्ये दुबई पोलिसांनी गायकाविरुद्ध औपचारिकपणे गुन्हा दाखल केला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गायक लाहोर येथून एका कार्यक्रमासाठी दुबईमध्ये आले असता विमातळावरच त्यांना अटक करण्यात आली आणि पुढील चौकशीसाठी पोलीस स्थानकात नेण्यात आलं.
View this post on Instagram
राहत फतेह अली खान यांनी सक्षम जबाब नोंदवल्यानंतर पोलिसांनी जामिनावर गायकाची सुटका केली. सांगायचं झालं तर, राहत फतेह अली खान आणि माजी मॅनेजर सलमान यांनी एकमेकांवर अनेक गुन्हे दाखल केले आहेत. राहत यांचे स्थानिक मॅनेजर आणि दुबईतील प्रवर्तक यांनी अटकेनंतर जामीनासाठी वकिलांची नियुक्ती केली. राहत यांच्यासोबत दुबईत त्याचा मेहुणा बक्का बुर्कीही आहे.
राहत फतेह अली खान यांनी सलमान याच्या विरोधात पाकिस्तान याठिकाणी तक्रार दाखल केली आहे. तर सलमान याने राहत यांच्या विरोधात दुबई आणि अमेरिकेत बदनामीचे गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, नुकताच झालेल्या कारवाईत राहत यांनी सर्व गुन्हे फेटाळले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त राहत फतेह अली खान यांच्यावर झालेल्या कारवाईची चर्चा रंगली आहे.