Raju Srivastava: राजू श्रीवास्तव यांची प्रकृती अद्याप गंभीर; अजूनही व्हेंटिलेटरवरच, सेलिब्रिटींकडून प्रार्थना
राजू यांच्यावर उपचार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. राजू यांच्या प्रकृतीत अद्याप कोणतीही सुधारणा झाली नाही. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांच्या प्रकृतीशी संबंधित महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. ताज्या माहितीनुसार, राजू यांची प्रकृती अद्यापही गंभीर आहे. ब्रेन डेड किंवा कोमात गेल्याची कोणतीही माहिती डॉक्टरांनी दिलेली नाही. एम्स (AIIMS) रुग्णालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टरांचं म्हणणे आहे की, राजू यांच्यावर उपचार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. राजू यांच्या प्रकृतीत अद्याप कोणतीही सुधारणा झाली नाही. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 10 ऑगस्ट रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ते अद्याप व्हेंटिलेटरवर (Ventilator) आहेत.
सेलिब्रिटींकडून प्रार्थना
राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीसाठी केवळ सामान्य लोकच नाही तर सेलिब्रिटीसुद्धा प्रार्थना करत आहेत. बॉलिवूडचे सुप्रसिद्ध गीतकार मनोज मुंतशीर यांनीही त्यांच्या इंस्टाग्रामवर राजू श्रीवास्तव यांचा फोटो पोस्ट केला आणि त्यांना लवकरात लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर शेखर सुमनदेखील सतत त्यांच्या तब्येतीचे अपडेट्स चाहत्यांना देत आहेत. ते सतत राजू यांच्या कुटुंबाच्या संपर्कात आहेत.
अमिताभ बच्चन यांनी पाठवला ऑडिओ मेसेज
काही दिवसांपूर्वी बिग बींनी राजू श्रीवास्तव यांच्यासाठी एक ऑडिओ मेसेज पाठवला होता. एम्सच्या डॉक्टरांनी त्यांच्या कुटुंबीयांना सल्ला दिला होता की, राजू यांना अशा व्यक्तीचा आवाज ऐकायला द्यावा, जे ऐकून ते त्याला प्रतिसाद देतील. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी त्यांच्यासाठी खास संदेश पाठवला होता. “राजू उठ, पुरे झालं आता, अजून खूप काम बाकी आहे”, असं त्यांनी ऑडिओ मेसेजमध्ये म्हटलं होतं.
केवळ चमत्कारच वाचवू शकेल..
राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीविषयी बोलताना एहसान कुरेशी म्हणाले, “डॉक्टरांनी आपले हात वर केले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत असल्याचं त्यांनी कुटुंबियांना सांगितलं आहे, पण आता केवळ चमत्कारच त्यांना वाचवू शकतो. त्यांच्या मृत्यूची बातमी खोटी आहे. ते ब्रेन डेड झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. आम्ही सर्वजण प्रार्थना करत आहोत आणि काही मिनिटांपूर्वी हनुमान चालिसाचा जप केला आहे. राजू यांचे कुटुंबीय आणि त्यांचे मित्र त्यांच्यासाठी सतत प्रार्थना करत आहेत. एकीकडे डॉक्टरांनी राजूबद्दलची आशा सोडली आहे, तर दुसरीकडे आपला पती लवकरच बरा होईल अशी आशा त्यांची पत्नी शिखा यांना आहे.