“जातीबाहेर लग्न करणारा मी कुटुंबातील पहिलाच..”; अभिनेत्याचा खुलासा, वरातीत पाहुण्यांपेक्षा अधिक सुरक्षारक्षक
रणदीप हुड्डाने मणिपूरच्या लिन लैश्रामशी लग्न केलं. इंफाळमध्ये पारंपरिक मणिपुरी पद्धतीने या दोघांचा लग्नसोहळा पार पडला होता. या लग्नाविषयी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रणदीपने काही खुलासे केले आहेत.

अभिनेता रणदीप हुड्डाने लिन लैश्रामशी नोव्हेंबर 2023 मध्ये लग्न केलं. या दोघांचं लग्न अनेकांसाठी अनोखं होतं. कारण रणदीप हरयाणातील जाट आहे, तर लिन मणिपूरची आहे. इंफाळमध्ये पारंपरिक मणिपुरी पद्धतीने हा लग्नसोहळा पार पडला होता. सेलिब्रिटींचा असा अनोखा लग्नसोहळा नेटकऱ्यांनीही पहिल्यांदाच पाहिलं होतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रणदीप त्याच्या लग्नाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. मला कधीच लग्न करायचं नव्हतं, पण लिनला भेटल्यावर लग्नाबद्दलचं माझं मत बदललं, अशी कबुली त्याने दिली. इतकंच नव्हे तर जातीबाहेर लग्न करणारा मी कुटुंबातील पहिलाच व्यक्त आहे, असाही खुलासा रणदीपने केला.
“मी शाळेत खूप दु:खी असायचो. मी या जगात आणखी एक व्यक्ती आणणारच नाही, ज्याला माझ्यासारखं असं शाळेत जावं लागेल, असा मी विचार करायचो (हसतो). त्यामुळे लग्न करण्याचा माझा कधी हेतूच नव्हता. पण कुठेतरी लिनमुळे माझं मत बदललं आणि त्याबद्दल मी खूप खुश आहे. मी उशिराच लग्न केलं. माझ्याकडे सरकारी नोकरी नाही, अशी मी मस्करी करायचो”, असं तो म्हणाला.




लग्नासाठी ईशान्य भारत का निवडलं, याचंही कारण रणदीपने शुभांकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं आहे. “अर्थातच तो आपल्या देशाचा एक भाग आहे. एखादी व्यक्ती जेव्हा प्रेमात पडते, तेव्हा ती जात, धर्म, देश किंवा वय या गोष्टींचा विचार करत नाही. आमचंही प्रेम असंच होतं. आम्ही एकमेकांसोबत खुश आहोत”, असं त्याने सांगितलं.
View this post on Instagram
सर्वसामान्य जोडप्यांप्रमाणे रणदीपलाही त्याच्या आंतरधर्मीय लग्नाच्या वेळी काही समस्यांचा सामना करावा लागला होता. याविषयी तो पुढे म्हणाला, “आमच्याही लग्नाच्या वेळी समस्या उद्भवल्या होत्या. इतरांप्रमाणे मीसुद्धा माझ्या जातीतल्या मुलीशीच लग्न करावं, अशी आईवडिलांची इच्छा होती. त्यामुळे मणिपुरी मुलीशी लग्न करतोय म्हटल्यावर प्रत्येकाने सवाल केला. परंतु नंतर हळूहळू त्यांनी मान्यता दिली. आमच्या लग्नाच्या वेळी मणिपूरमध्ये बरेच वाद सुरू होते. पण लग्न नवरीच्या शहरातच पार पडलं पाहिजे, असा माझा विचार होता. मला माझ्या पत्नीच्या आणि तिच्या कुटुंबीयांच्या संस्कृतीचं आदर करायचं होतं, त्यांना पाठिंबा द्यायचा होता.”
लग्न सुरळीत पार पाडण्यासाठी रणदीपने भारतीय सैन्याची मदत घेतली. हरियाणाहून मणिपूरला गेल्यानंतर तो आणि त्याच्या कुटुंबातील नऊ सदस्य हे एका लष्करी ब्रिगेडियरच्या घरी राहिले होते. “सुरक्षारक्षकांनी आम्हाला सर्वत्र नेलं होतं. आमच्याकडे वरातीत पाहुण्यांपेक्षा अधिक सुरक्षारक्षक होते. आम्ही फक्त दहा जण होतो. कारण आम्हाला वधूच्या कुटुंबावर मानपानाचा अधिक भार टाकायचा नव्हता. मणिपूरमधील वातावरण ठीक नसल्याने आम्हाला लग्नाची फार धामधूम नको होती. आमचा लग्नसोहळा खूप साधा होता, परंतु प्रत्येकाचं लक्ष त्याकडे वेधलं गेलं. त्याठिकाणी इंटरनेट नव्हतं. नंतर आम्हाला समजलं की आमचं लग्न इंटरनेटवर लाइव्ह दाखवलं गेलं होतं. त्याचं आयोजन कोणी केलं होतं, हे आम्हालाही माहीत नाही”, असं त्याने स्पष्ट केलं.