मराठीच तुरळक सिनेमे केले अन् आज मराठीचा मुद्दा..; रेणुका शहाणेंच्या पोस्टवर नेटकऱ्यांचे कमेंट्स
महाराष्ट्रात मराठी तरुण-तरुणींना नोकरी नाकारत असल्याचं वास्तव एका नोकरीच्या जाहिरातीतून समोर आलं. या जाहिरातीवर नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. आता अभिनेत्री रेणुका शहाणे यांनीसुद्धा त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
मराठी लोकांना इथे स्थान नाही, असं एका नोकरीच्या जाहिरातीत म्हटल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. गुजरातमधील एका फ्रीलान्स एचआर रिक्रूटरने ग्राफिक डिझायनरसाठीच्या मुंबईतील नोकरीची जाहिरात तिच्या लिंक्डइन अकाऊंटवर पोस्ट केली होती. परंतु या जाहिरातीत ‘मराठी लोकांचं इथे स्वागत नाही’ असा मजकूर लिहिल्याने नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. याबाबत आता अभिनेत्री रेणुका शहाणे यांनीही पोस्ट लिहिली आहे. ‘मराठी लोकांचं इथे स्वागत नाही म्हणणाऱ्यांना कृपया मत देऊ नका’, असं आवाहन त्यांनी चाहत्यांना केलं आहे. मात्र रेणुका यांच्या या पोस्टवरून काहींनी टीकासुद्धा केली आहे. मराठीत तुरळक सिनेमे केले, अन् आज मराठीचा मुद्दा काढून काय मिळवलं, असा सवाल एका युजरने केला.
रेणुका शहाणे यांची पोस्ट-
‘मराठी नॉट वेलकम म्हणणार्या लोकांना कृपया मत देऊ नका. मराठी लोकांना घरं न देणाऱ्या लोकांचं समर्थन करणाऱ्या उमेदवारांना कृपया आपलं बहुमूल्य मत देऊ नका. ज्यांच्या कामाच्या ठिकाणी मराठी भाषा किंवा लोकांना कमी लेखलं जातं, अशा लोकांचं समर्थन करणाऱ्या उमेदवारांना किंवा पक्षाला कृपया मत देऊ नका. कुठल्याही जाती, धर्म किंवा भाषेच्या विरुद्ध मी नाही, पण जे आपल्याच महाराष्ट्रात, आपल्या भाषेचा आणि संस्कृतीचा मान ठेवत नाहीत, अशा लोकांना, शांतपणे, मत न देऊन, त्यांची चूक दाखवून दिलीच पाहिजे,’ अशा शब्दांत त्यांनी भूमिका मांडली. त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
‘ज्या रेणुका ताई आज मराठीवर इतकं ज्ञान देत आहेत. त्यांनी हिंदीवर जास्त प्रेम करण्याचं काय कारण? मराठीत तुरळक सिनेमे केले अन् आज मराठीचा मुद्दा काढून काय मिळवलं आणि हे सोसायटी चेअरमनची निवडणूक नाही. राष्ट्रीय नेता निवडायचा आहे’, अशी टीका एका युजरने केली. त्यावर उत्तर देताना रेणुका यांनी लिहिलं, ‘तुम्हाला माझ्या निवेदनात नक्की काय बोचलं? मी कुठल्या भाषेत किती काम केलं हा मुद्दाच नाही आहे, पण मराठी भाषेचा किंवा लोकांचा अपमान करणार्या उमेदवारांना निवडून न आणणं ही आपली जबाबदारी आहे, मग ते कुठल्याही पक्षाचे असोत. सोसायटी चेअरमनची निवडणूक असो किंवा राष्ट्रीय, आपल्या भाषेचा अपमान कुठेही का सहन करावा,’ असा सवाल त्यांनी संबंधित युजरला केला.
दरम्यान, मराठी लोकांचं इथे स्वागत नाही असा मजकूर असलेली जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल होऊन नेटकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागल्यानंतर संबंधित एचआरने माफी मागितली आहे. ‘मी खरोखर माफी मागते. काही दिवसांपूर्वी मी ग्राफिक डिझायनरच्या नोकरीसंदर्भातील जाहिरात पोस्ट केली होती आणि त्या जाहिरातीतील एका आक्षेपार्ह वाक्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. तुम्हाला कळवायचं आहे की मी अशा गोष्टींना समर्थन देत नाही, ज्यामध्ये कोणाशीही भेदभाव होईल. हे माझ्या दुर्लक्षामुळे झालं’, असं या एचआरने माफी मागताना म्हटलं होतं.