Rhea Chakraborty | जेलमध्ये कैद्यांसोबत जमिनीवर लोळून केला नागिन डान्स; रिया चक्रवर्तीचा खुलासा
सुशांतच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबीयांनी रियावर त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रिया या सर्व आरोपांवर पुन्हा एकदा मोकळेपणे व्यक्त झाली. तुरुंगातील सहा आठवडे कसे होते, याचाही अनुभव तिने सांगितला.
मुंबई | 6 ऑक्टोबर 2023 : अभिनेत्री रिया चक्रवर्ती नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर तिच्या आयुष्यात आलेल्या वादळाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. 14 जून 2020 रोजी मुंबईतल्या वांद्रे इथल्या राहत्या घरी सुशांत मृतावस्थेत आढळला होता. सुशांतच्या निधनानंतर रियाच्या आयुष्यात असंख्य चढ-उतार आले. इतकंच नव्हे तर तिला अटकसुद्धा झाली होती. या अटकेनंतर ती जवळपास सहा आठवडे भायखळा तुरुंगात होती. तुरुंगातील दिवसांबद्दल रियाने या मुलाखतीत बरंच काही सांगितलं.
तुरुंगातील दिवस कसे होते?
सुशांतच्या निधनानंतर ड्रग्जप्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) रिया चक्रवर्तीला अटक केली होती. या अटकेनंतर जवळपास सहा आठवडे ती मुंबईतल्या भायखळा जेलमध्ये होती. तुरुंगात असताना छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद कसा शोधायचा याची शिकवण मिळाल्याचं तिने यावेळी सांगितलं. तुरुंगातील दिवसांबद्दल रिया म्हणाली, “जेलमध्ये तुमची ओळखच हिरावून घेतली जाते. तुम्हाला केवळ एका नंबरने ओळखलं जातात. इथे आम्ही चित्रपटांच्या मागे धावतो, मोठ्या आनंदाची प्रतीक्षा करतो. मात्र कधी कधी लहान-सहान आनंद मिळाला तरी आपण समाधानी राहिलं पाहिजे. तुरुंगात एक समोसा मिळाल्यावरही कैदी प्रचंड खुश व्हायचे.”
तुरुंगात रियाचा नागिन डान्स
रियाने सांगितलं की तिने तुरुंगात तिच्यासोबत असलेल्या इतर कैद्यांना हे वचन दिलं होतं की ज्यादिवशी तिला जामिन मिळेल त्यादिवशी ती सर्वांसमोर नागिन डान्स करणार. मात्र रियाला जेव्हा जामिन मिळाला, तेव्हा तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती मात्र तुरुंगातच होता. तरीसुद्धा इतर कैद्यांना दिलेलं वचन पूर्ण केल्याचं रियाने सांगितलं.
याविषयी रिया पुढे म्हणाली, “माझं मन नव्हतं. कारण माझ्या भावाचा जामिनाचा अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यामुळे मी पूर्णपणे खचली होती. मात्र तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर मी त्या लोकांना पुन्हा कधी भेटणार हे माहीत नव्हतं. म्हणून त्यांना थोडाफार का होईन, पण माझ्या नागिन डान्सने आनंद देऊ शकले तर मी ते नक्की करीन असा विचार केला. त्यामुळे वचन दिल्याप्रमाणे शेवटच्या दिवशी मी त्या सर्वांसाठी नागिन डान्स केला. त्यावेळी माझ्यासोबत इतर महिला कैदीसुद्धा नाचल्या होत्या. सर्वजण जमिनीवर अक्षरशः लोळून लोळून हसत होते.”
आयुष्यातील या कठीण काळात कुटुंबीयांनी खूप साथ दिल्याचंही रियाने सांगितलं. “आई-वडिलांनी मला जगण्याची हिंमत दिली तर बरेच मित्र-मैत्रिणी सुद्धा खंबीरपणे पाठीशी उभे होते. कारण त्यांना माझ्यावर पूर्ण विश्वास होता”, असं ती म्हणाली.