सुशांतच्या निधनानंतर झालेल्या टीकांवर पहिल्यांदाच रियाने सोडलं मौन; म्हणाली “लोकांना खड्ड्यात..”
सुशांतच्या मृत्यूनंतर रियाला मीडिया ट्रायलचा सामना करावा लागला होता. तिच्यावर सातत्याने टीकेचा भडीमार झाला होता. रियावर सुशांतला ड्रग्ज पुरविल्याचा, मनी लाँड्रिंग आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप होता.
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर त्याची कथित गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर प्रश्नांचा भडीमार झाला. सुशांतच्या मृत्यूप्रकरणी ड्रग्जच्या अँगलने तपास करताना एनसीबीने रियाला अटकसुद्धा केली होती. रियाच्या भावाने सुशांतला ड्रग्ज पुरवले, असा आरोप करण्यात आला होता. या सर्व घटनांदरम्यान रियाने कोणतीच प्रतिक्रिया दिली होती. जवळपास तीन वर्षांनंतर आता तिने एमटीव्ही रोडीज 19 मधून पुनरागमन केलं आहे. नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये रियाने तिच्या आयुष्यातील त्या कठीण काळाविषयी वक्तव्य केलं. त्याचसोबत तिच्यावर टीका करणाऱ्यांनाही रियाने सडेतोड उत्तर दिलं.
‘रोडीज 19’ या शोच्या आगामी एपिसोडचा नवीन प्रोमो नुकताच समोर आला आहे. या प्रोमोमध्ये रिया एका स्पर्धकाशी बोलताना दिसतेय. स्पर्धक त्यांच्या आयुष्यातील संघर्षाविषयी बोलताना भावूक होत आहेत आणि रिया त्यांना समजावण्याचा प्रयत्न करते. “लोक बरंच काही बोलतात. मात्र आपण त्यांच्या आवाजाला जोर नाही दिला पाहिजे. त्या लोकांना खड्ड्यात जाऊ द्या”, असं ती म्हणते.
“बरेच लोक बरंच काही बोलत असतात. लोक माझ्याबद्दलही बरं-वाईट बोलत असतात. मला वेगवेगळी नावं ठेवली. मात्र त्या कारणामुळे मी त्यांच्या गोष्टींवर विश्वास ठेवणार का? त्यांच्यामुळे मी माझ्या आयुष्यात थांबणार का? अजिबात नाही. मी त्यांच्या आवाजाला महत्त्व देणार का? नाही, माझा स्वत:चा आवाज आहे आणि तुमचाही. तुम्हीसुद्धा त्याच आवाजाला ऐका आणि लोकांना खड्ड्यात जाऊ द्या. हे लोक आहेत तरी कोण”, असं म्हणत ती स्पर्धकांना धीर देते. लोक काय म्हणतात यापेक्षा स्वत:ला काय वाटतं तेच करण्यावर अधिक भर द्यावा, असा सल्ला ती देते.
View this post on Instagram
सुशांतच्या मृत्यूनंतर रियाला मीडिया ट्रायलचा सामना करावा लागला होता. तिच्यावर सातत्याने टीकेचा भडीमार झाला होता. रियावर सुशांतला ड्रग्ज पुरविल्याचा, मनी लाँड्रिंग आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप होता. अटकेनंतर जवळपास महिनाभर ती तुरुंगात होती. 14 जून 2020 रोजी मुंबईतल्या वांद्रे इथल्या राहत्या घरी तो मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या मृत्यूचा तपास अद्याप सीबीआयकडून केला जात आहे.
रिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंह राजपूत हे एकमेकांना डेट करत होते. सुशांतच्या 36 व्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर फोटो पोस्ट तिने रिलेशनशिप जाहीर केलं होतं. हे दोघं 2020 च्या अखेरीस लग्न करणार होते, अशीही चर्चा होती. मात्र त्याच वर्षी जून महिन्यात सुशांत मृतावस्थेत आढळला होता.