देशभरात सायबर गुन्हे खूपच वेगाने वाढत आहेत. गंभीर गुन्ह्यांपेक्षा सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दुपटीपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे पोलिसांसमोरही सायबर गुन्हे डोकेदुखी ठरत आहेत. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना सायबर फसवणुकीचा (Cyber Fraud) फटका बसला आहे. आता बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक बोनी कपूर (Boney Kapoor) यांची सायबर फसवणूक करण्यात आली आहे. क्रेडिट कार्डची (Credit Card) गोपनीय माहिती मिळवून सायबर चोरट्यांनी त्यांच्याकडून पावणे चार लाख रुपये लुटले आहेत. याप्रकरणी आंबोली पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. बोनी कपूर यांच्या बँक खात्यातून 3 लाख 82 हजार रुपये लंपास करण्यात आले आहेत. या गुन्ह्याचा तपास आंबोली पोलिसांकडून सुरू आहे.
बोनी कपूर हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक असून अभिनेत्री जान्हवी कपूरचे वडील आहेत. देशात ज्या वेगाने डिजिटल व्यवहार होऊ लागले आहेत, त्याच वेगाने ऑनलाइन फसवणुकीच्या घटनाही वाढत आहेत. आपले डेबिट किंवा क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती, पिन क्रमांक कोणालाही सांगू नये असं वारंवार बजावण्यात येतं. मात्र अनेकदा सायबर चोरटे यात इतके सराईत असतात, की भल्याभल्यांना त्यांची फसवणूक होतेय, हे समजत नाही. बोनी कपूरसुद्धा अशाच फसवणुकीला बळी पडले आहेत.
याआधीही अनेक सेलिब्रिटींना सायबर क्राईमचा फटका बसला आहे. बॉलिवूडपासून ते अगदी मराठी कलाकारांचीही सायबर फसवणूक झाली आहे. अनेकदा सेलिब्रिटींच्या नावाचा गैरवापर करून सर्वसामान्यांकडूनही पैसे उकळले जातात. निया शर्मा, रश्मी देसाई, देवोलिना भट्टाचार्जी यांसारख्या अभिनेत्रींना साइबर क्राईमचा फटका बसला आहे.