हृतिकच्या 12 वर्षांनी लहान गर्लफ्रेंडने अखेर रिलेशनशिपबाबत सोडलं मौन; ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर
हृतिक आणि सबाची पहिल्यांदा ओळख ही ट्विटरवर झाल्याचं म्हटलं जातं. हृतिकने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओमध्ये सबा एका रॅपरसोबत दिसत होती. त्यानंतर सबाने हृतिकचे आभार मानले आणि दोघांचा संवाद सुरू झाला.
मुंबई | 24 ऑगस्ट 2023 : अभिनेता हृतिक रोशन आणि त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद यांचं रिलेशनशिप सोशल मीडियावर सतत चर्चेत असतं. अनेकदा या दोघांना विविध कार्यक्रमांमध्ये, पार्ट्यांमध्ये एकत्र पाहिलं जातं. करण जोहरच्या 50 व्या वाढदिवसाच्या पार्टीत सबा आणि हृतिकने त्यांचं रिलेशनशिप सर्वांसमोर जाहीर केलं. नुकतेच हे दोघं अर्जेंटिनाला सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी गेले होते. मात्र हृतिक आणि सबाच्या जोडीला सोशल मीडियावर सतत ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. त्यावर आता सबाने मौन सोडलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सबा आझादने हृतिकसोबतच्या नात्यावरून होणाऱ्या ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिली आहे.
‘न्यूज 18’ला दिलेल्या मुलाखतीत सबाला विचारलं गेलं की, “तुझ्या लव्ह-लाइफवर सतत लोकांची नजर असते. त्यावर टीका होत असते. यामुळे तुला काही त्रास होतो का?” त्यावर ती म्हणाली, “अशा गोष्टींचा कोणाला त्रास होत नाही? प्रत्येकाला त्याचा त्रास होतो. पण मला असं वाटतं की हा आमच्या आयुष्याचाच एक भाग आहे. लोकांना फक्त इतरांच्या आयुष्यात काय चाललंय हे जाणून घेण्यात स्वारस्य असतं. आपण त्याबद्दल काय करू शकतो? तुम्ही फक्त मान खाली घालून तुमचं काम करत राहा. त्या गोष्टींचा तुमच्या आयुष्यावर काही परिणाम होऊ देऊ नका. तुम्ही हसत राहा आणि पुढे जा. हे सर्व कामाचा एक भाग आहे. माझ्या आयुष्यातील एकमेव भाग ज्याबद्दल मला सार्वजनिकपणे व्यक्त होताना आनंद होतो, ते म्हणजे माझं काम. त्याव्यतिरिक्त कोणताही विषय हा लोकांच्या चर्चेसाठी नाही.”
View this post on Instagram
हृतिक आणि सबा आझादच्या वयात जवळपास 12 वर्षांचं अंतर आहे. हृतिकच्या कुटुंबीयांशीही सबाची जवळीक वाढली आहे. त्याच्या कुटुंबीयांसोबत मिळून तिने जेवण केलं होतं. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हृतिक आणि सबाची पहिल्यांदा ओळख ही ट्विटरवर झाल्याचं म्हटलं जातं. हृतिकने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओमध्ये सबा एका रॅपरसोबत दिसत होती. त्यानंतर सबाने हृतिकचे आभार मानले आणि दोघांचा संवाद सुरू झाला.