सैफवरील चाकूहल्ल्याप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांची महत्त्वपूर्ण माहिती
अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या चाकूहल्ल्याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. सैफवर त्याच्याच राहत्या घरी एका चोराकडून चाकूहल्ला झाला होता. चोराने त्याच्यावर चाकूने सहा वार केले होते.

अभिनेता सैफ अली खानवर 16 जानेवारी रोजी त्याच्याच राहत्या घरी एका चोराने चाकूहल्ला केला होता. चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या चोराला सर्वांत आधी सैफ आणि करीना कपूर यांच्या मुलांच्या खोलीत पाहिलं गेलं होतं. मुलांना वाचवण्यासाठी पुढे धावलेल्या सैफची चोरासोबत झटापट झाली. तेव्हा चोराने सैफवर चाकूने सहा वार केले. त्यापैकी दोन वार गंभीर स्वरुपाचे होते. लिलावती रुग्णालयात सैफवर शस्त्रक्रिया करून त्याच्या पाठीच्या मणक्याजवळ रुतलेल्या चाकूच्या तुकड्याला बाहेर काढण्यात आलं होतं. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी शरीफुल इस्लाम नावाच्या आरोपीला अटक केली. शरीफुल हा मुळचा बांगलादेशचा आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार आता मुंबई पोलिसांनी त्याच्याविरोधात वांद्रे कोर्टात 1000 पानी आरोपपत्र दाखल केलं आहे.
“या चार्जशीटमध्ये शरीफुल इस्लामविरोधात आम्हाला सापडलेल्या अनेक पुराव्यांचा उल्लेख आहे. हे चार्जशीट एक हजारहून अधिक पानांचं आहे. त्याचप्रमाणे त्यात फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट्ससुद्धा आहेत. गुन्हा घडलेल्या जागेवरून, सैफ अली खानच्या पाठीतून काढलेले आणि आरोपीकडून हस्तगत केलेले तीन तुकडे हे एकाच चाकूचे असल्याचं त्यात म्हटलंय”, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली. चौकशीदरम्यान आरोपीच्या डाव्या हाताचे फिंगरप्रिंट्स रिपोर्टसुद्धा त्यात समाविष्ट असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
झटापटीत चोराने सैफवर चाकूने सहा वार केले होते. त्यापैकी दोन वार खोलवर झाले होते. त्यानंतर सैफवर न्यूरोसर्जरी आणि प्लास्टिक सर्जरी करण्यात आली होती. सैफच्या मणक्याजवळ अडीच इंचाचा चाकूचा तुकडा रुतला होता, तोही काढल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती.




पोलिसांच्या चौकशीदरम्यान आरोपी शरीफुल म्हणाला होता, “मी सैफ अली खानचं घर ओळखत नाही. सदगुरू शरण इमारतीत प्रवेश करताना मी इतर काही घरांमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला, परंतु सर्व घरं बंद होती. पण जेव्हा मी सैफच्या घराजवळ पोहोचलो, तेव्हा त्याच्या घराचा मागचा दरवाजा उघडा होता. म्हणून मी आत शिरण्यात यशस्वी ठरलो.” सैफवरील हल्ल्याचं प्रकरण मीडियासमोर आल्यानंतर आरोपीला समजलं की तो ज्या घरात गेला होता, ते अभिनेता सैफ अली खानचं घर होतं.