“मुलाचं नाव ‘राम’ नाही ठेवू शकत”; सैफचा Video पाहून भडकले नेटकरी
मुलाचं नाव तैमुर का ठेवलं? सैफचं उत्तर ऐकून चाहत्यांचा तीव्र संताप
मुंबई- सोशल मीडियावर सध्या ‘बॉयकॉटचा ट्रेंड’ काही नवीन नाही. एखाद्या कलाकाराच्या जुन्या वक्तव्यावरून किंवा मुलाखतीवरून त्याच्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जातेय. याता आता अभिनेता सैफ अली खानचा (Saif Ali Khan) समावेश झाला आहे. सैफचा ‘विक्रम वेधा’ (Vikram Vedha) हा चित्रपट आज (30 सप्टेंबर) प्रदर्शित झाला आहे. त्याचा चित्रपट थिएटर्समध्ये प्रदर्शित होताच दुसरीकडे सोशल मीडियावर एक जुना व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये सैफ त्याच्या मुलाच्या नावाबद्दल बोलताना दिसून येत आहे. मुलाचं नाव तैमुर (Taimur) ठेवल्याबद्दल सैफ आणि करीनाला अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल केलं गेलंय. आता सैफच्या मुलाखतीचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर नेटकरी त्याच्या ‘विक्रम वेधा’ या चित्रपटावर बहिष्काराची मागणी करत आहेत.
काय म्हणाला सैफ?
सैफची ही फार जुनी मुलाखत आहे. यामध्ये तो म्हणतोय की त्याच्या मुलाचं नाव तो ‘राम’ नाही ठेवू शकत. तर करीना कपूर एका शोमध्ये तैमुरचं नाव घेऊन मुघल शासकांची स्तुती करताना दिसतेय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “मी माझ्या मुलाचं नाव ॲलेक्झांडर नाही ठेवू शकत आणि वास्तवात त्याचं नाव मी ‘राम’सुद्धा नाही ठेवू शकत. मग एखादं चांगलं मुस्लीम नाव का नाही? त्याला आम्ही धर्मनिरपेक्षतेचं महत्त्व समजावून सांगू”, असं सैफ या व्हिडीओत म्हणताना दिसतोय.
पहा व्हिडीओ-
#BoycottVikramVedha pic.twitter.com/4CFm8eOIAo
— SS (@SS92765750) September 27, 2022
सैफ आणि करीनाने त्यांच्या मुलाचं तैमुर ठेवल्यानंतर त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. तैमुर हा तुर्क शासक होता. 14 व्या शतकात त्याने भारतात खूप लूट केली होती आणि लोकांवर अन्याय केला होता. तैमुरने कित्येक हजार लोकांचे प्राण घेतले होते. अशा व्यक्तीचं नाव सैफ आणि करीनाने आपल्या मुलाला दिल्याने चाहत्यांनी संताप व्यक्त केला होता.
सैफच्या या विधानावरून आता ‘विक्रम वेधा’ चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. या चित्रपटाविरोधात बॉयकॉट ट्रेंड चालवण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे याच नावाने साऊथ सिनेमा प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये विजय सेतुपती आणि आर. माधवन यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. दाक्षिणात्य कलाकारांनी मास्टरपीस बनवला आणि तोच बॉलिवूड कलाकारांनी कॉपी केला, अशी टीका नेटकरी करत आहेत.