Bal Shivaji | ‘लहान असो वा मोठा वाघ वाघच असतो’; ‘बाल शिवाजी’च्या भूमिकेतील आकाश ठोसरने वेधलं लक्ष
'लहान असो वा मोठा वाघ ‘वाघच’ असतो. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळादिनानिमित्त सादर आहे, स्वराज्याच्या पायाभरणीची अद्भुत गाथा ‘बाल शिवाजी’ या महाचित्रपटाचे पहिले पोस्टर,' असं कॅप्शन देत आकाशने हा फर्स्ट लूक शेअर केला आहे.
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकाच्या 350 वर्षानिमित्त ‘बाल शिवाजी’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. निर्माते संदीप सिंग आणि एव्हीएस स्टुडिओज यांनी या चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्ट जाहीर केला आहे. या पोस्टमध्ये ‘सैराट’मध्ये परश्याची भूमिका साकारलेला अभिनेता आकाश ठोसर हा मुख्य भूमिकेत पहायला मिळतोय. राष्ट्रीय पुरस्कार विजेते रवी जाधव या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित असलेला हा चित्रपट मोठ्या बजेटमध्ये निर्मित केला जाणार आहे.
‘लहान असो वा मोठा वाघ ‘वाघच’ असतो. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळादिनानिमित्त सादर आहे, स्वराज्याच्या पायाभरणीची अद्भुत गाथा ‘बाल शिवाजी’ या महाचित्रपटाचे पहिले पोस्टर,’ असं कॅप्शन देत आकाशने हा फर्स्ट लूक शेअर केला आहे.
या चित्रपटाबद्दल रवी जाधव म्हणाले, “या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांचे आई-वडील, जिजामाता आणि शहाजी राजे भोसले यांनी लहानपणी त्यांच्यासाठी एक मजबूत पाया उभारून दिलेलं अमूल्य योगदानाची कथा दाखवण्यात येणार आहे. लहानपणापासूनच एक योद्धा आणि शासक म्हणून त्यांची कशा पद्धतीने कौशल्ये आत्मसात केली, हे त्यात पहायला मिळणार आहे. मी नऊ वर्षे स्क्रिप्टवर काम केलंय आणि आता मोठ्या पडद्यावर ते सर्व साकारण्यासाठी सज्ज झालोय. दिग्दर्शक म्हणून मी पहिल्यांदाच ऐतिहासिक चित्रपट करणार आहे. निर्मात्यांना या चित्रपटाच्या कथेचं महत्त्व समजलं होतं. मुख्य भूमिकेसाठी आकाश ठोसरची निवड आम्ही एकमताने केली. तरुण राजाची भूमिका साकारण्यासाठी त्याच्याकडे राजसी रुप आणि व्यक्तीमत्त्व आहे. या भूमिकेसाठी त्याचा उत्साह आणि उत्सुकता पाहून मी प्रभावित झालोय.”
View this post on Instagram
“प्रत्येकाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माहीत आहे. पण त्यांच्या बालपणाविषयी फार क्वचित लोकांना संपूर्ण माहिती आहे. जेव्हा रवी जाधव यांनी मला कथा ऐकवली, तेव्हा मी थक्क झालो होतो. ही कथा आई आणि मुलाविषयी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना या जगातील सर्वांत निर्भय आणि शूर योद्धा म्हणून कसं वाढवलं गेलं त्याची ही कथा आहे”, असं निर्माते संदीप सिंग म्हणाले.
बाल शिवाजी या चित्रपटाची निर्मिती संदीप सिंग यांच्यासोबतच सॅम खान, रवी जाधव, विशाल गुर्नानी, जुही पारेख मेहता आणि अभिषेक व्यास यांनी केली आहे. चिन्मय मांडलेकर आणि रवी जाधव यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे.