दुसरं लग्न करून पूर्व पतीने थाटला संसार; एकटेपणामुळे समंथाने प्रामाणिक पार्टनरची इच्छा केली व्यक्त
अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचा पूर्व पती नाग चैतन्यने 4 डिसेंबर रोजी गर्लफ्रेंड सोभिता धुलिपालाशी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. समंथा आणि नाग चैतन्य लग्नाच्या चार वर्षांतच 2021 मध्ये विभक्त झाले. त्यानंतर नाग चैतन्य सोभिताला डेट करू लागला होता.
दाक्षिणात्य अभिनेता नाग चैतन्य याने समंथा रुथ प्रभूला घटस्फोट दिल्याच्या तीन वर्षांनंतर दुसऱ्यांदा लग्न केलंय. 4 डिसेंबर रोजी हैदराबादमधील अन्नपूर्णा स्टुडिओजमध्ये त्याने अभिनेत्री सोभिता धुलिपालाशी लग्नगाठ बांधली. दुसरीकडे समंथा मात्र अजूनही ‘सिंगल’च आहे. मात्र आता पूर्व पतीच्या दुसऱ्या लग्नानंतर तिनेसुद्धा एका प्रामाणिक पार्टनरची इच्छा व्यक्त केली आहे. त्याचसोबत आयुष्यातील एकटेपणा दूर व्हावा, यासाठी तिने प्रार्थना केली आहे. नाग चैतन्य आणि सोभिताच्या दुसऱ्या लग्नानंतर समंथाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली आहे.
समंथाने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये 2025 साठी वृषभ, कन्या आणि मकर या तीन राशींचं भविष्य सांगितलं आहे. समंथाच्या या पोस्टच्या मते, या राशींच्या लोकांसाठी येणारं नवीन वर्ष हे कमाई आणि प्रगतीच्या दृष्टीने खूप चांगलं असेल. मात्र सर्वांत खास गोष्ट म्हणजे या राशींच्या लोकांना एक प्रामाणिक आणि प्रेमळ पार्टनरसुद्धा मिळू शकतो. त्यांचे बरेच लक्ष्य पूर्ण होऊ शकतात. हीच पोस्ट शेअर करत समंथाने त्यावर ‘आमेन’ असं लिहिलंय. यावरून हे स्पष्ट होतंय की समंथाने नवीन वर्षात तिच्यासाठी हे सर्व खरं होण्यासाठी प्रार्थना केली आहे.
समंथाची पोस्ट-
समंथा आणि नाग चैतन्य यांनी 2017 मध्ये गोव्यात धूमधडाक्यात लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या चार वर्षांतच या दोघांचा घटस्फोट झाला. 2021 मध्ये सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्यांनी घटस्फोटाची माहिती दिली. घटस्फोटानंतर नाग चैतन्य हा अभिनेत्री सोभिता धुलिपालाला डेट करू लागला. नुकताच या दोघांचा लग्नसोहळा पार पडला. या लग्नानंतरही समंथाने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली होती.
‘जसजसं हे वर्ष संपत आलंय, तसतसं आपल्या प्रवासाला आकार देणाऱ्या चढ-उतारांचा विचार करतो. आव्हानांपासून ते विजयापर्यंत, विकास आणि आनंदाचे क्षण अनुभवत तुम्ही एखाद्या चमकदार ताऱ्याप्रमाणे वर्षाच्या शेवटपर्यंत पोहोचला आहात. या वर्षाने आपली परीक्षा घेतली आहे. परंतु त्याने आपल्याला सामर्थ्य, लवचिकता आणि चिकाटीचं सौंदर्यही शिकवलं आहे’, असं तिने त्यात लिहिलं होतं. समंथाने ही पोस्ट नाग चैतन्य आणि सोभिता धुलिपाला यांच्या लग्नाच्याच दिवशी केल्याने चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण आलं होतं.