Samantha: “अजून मेली नाही”; आजारपणावरील हेडलाइन्सवर भडकली समंथा
मायोसिटिस आजारावर समंथाचं स्पष्टीकरण; म्हणाली "माझ्या जिवाला धोका.."
मुंबई- दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सध्या मायोसिटिस या आजाराचा सामना करतेय. काही दिवसांपूर्वीच समंथाने पोस्ट लिहित याबद्दलची माहिती दिली होती. आजारावरील उपचार सुरू असतानाच समंथा तिच्या आगामी ‘यशोदा’ या चित्रपटाचं प्रमोशनसुद्धा करतेय. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत समंथाने माध्यमांमधील हेडलाइन्सवर राग व्यक्त केला. “मी जिवंत आहे, मेली नाही”, अशा शब्दांत तिने संताप व्यक्त केला.
समंथाच्या मायोसिटिस या आजाराविषयी कळताच चाहत्यांनी तिच्याविषयी काळजी व्यक्त केली. काही वृत्तांमध्ये समंथाची प्रकृती गंभीर असल्याचं म्हटलं गेलं. त्यावर बोलताना समंथा म्हणाली, “मी माझ्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलंच आहे की काही दिवस चांगले असतात तर काही वाईट. पुढे एक पाऊलसुद्धा टाकणं जेव्हा मला कठीण वाटतं, तेव्हा मी मागे वळून पाहते तर आश्चर्य वाटतं. मी खूप मेहनत करून इथपर्यंत पोहोचले. मी इथे लढायला आले आहे.”
View this post on Instagram
“मला आणखी एक बाब स्पष्ट करायची आहे, ती म्हणजे अनेक वृत्तांमध्ये माझी प्रकृती गंभीर असल्याचं म्हटलं गेलंय. मात्र मी हे सांगू इच्छिते की माझ्या जिवाला कोणताही धोका नाही. मी अद्याप मेली नाही. अशा हेडलाइन्स गरज असेल असं मला वाटत नाही”, असं ती पुढे म्हणाली.
मायोसिटिस म्हणजे काय?
मायोसिटिस ही आरोग्याची अशी एक स्थिती आहे ज्यामध्ये स्नायूंना तीव्र वेदना होतात. मायो म्हणजे स्नायू आणि आयटीस म्हणजे जळजळ (वेदना). याला व्हायरल इन्फेक्शन, विशिष्ट औषधं आणि स्वयं रोगप्रतिकार शक्ती अशी विविध कारणं कारणीभूत असू शकतात, अशी माहिती फोर्टिस रुग्णालयाच्या इंटर्नल मेडिसिन विभागाच्या संचालिका डॉ. सुधा मेनन यांनी दिली.