अंकिता लोखंडेच्या पतीवर ‘बिग बॉस’ची स्पर्धक फिदा; म्हणाली “जर अंकिता नसती तर..”
बिग बॉसच्या घरात कधी कोणाशी नातं जुळेल आणि कधी कोणाशी बिघडेल याचा काही नेम नाही. बिग बॉसच्या घरातून नुकत्याच बाहेर पडलेल्या एका स्पर्धकाने विकी जैनबद्दल तिच्यातली मनातली गोष्ट मोकळेपणे बोलून दाखवली. या दोघांना घरात एकमेकांचा हात पकडलेलं पाहिलं गेलं होतं.
मुंबई : 10 डिसेंबर 2023 | ‘बिग बॉस 17’मधील आणखी एक स्पर्धक घराबाहेर पडली आहे. प्रसिद्ध वकील सना रईस खानचा बिग बॉसमधील प्रवास संपुष्टात आला आहे. घरातून बाहेर पडल्यानंतर सनाने काही मुलाखती दिल्या आहेत. एका मुलाखतीत ती अभिनेत्री अंकिता लोखंडेचा पती विकी जैनबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. बिग बॉसच्या घरात सना आणि विकीला एकमेकांचा हात पकडताना पाहिलं गेलं होतं. यावरून सोशल मीडियावर दोघांनाही खूप ट्रोल करण्यात आलं होतं. आता सनाने त्याबद्दल बोलताना विकीविषयी आश्चर्यकारक वक्तव्य केलं आहे. “मला विकीने सांगितलं होतं की तुझं ज्या व्यक्तीशी जमतं किंवा ज्या व्यक्तीशी तुझं मन जोडलं जातं, त्याच्यासोबतच तू राहा. त्यावर मी त्याला म्हणाली होती की माझं मन ज्या व्यक्तीशी जोडलं गेलंय, तो आधीच दुसऱ्या एका व्यक्तीसोबत आहे”, असं ती म्हणाली.
यापुढे सना म्हणाली, “जर अंकिता बिग बॉसच्या घरात आली नसती तर माझं आणि विकीचं चांगलं जमलं असतं. जर विकी बिग बॉसच्या घरात एकटाच आला असता, तर मी आता जशी मन्नारासोबत राहते, तशी मी विकीसोबत राहिले असते.” हे ऐकल्यानंतर सनाला विचारलं गेलं की तिला विकी आवडतो का? त्याच्यावर तिचा क्रश आहे का? त्यावर ती हसत उत्तर देते, “जर असं असतं तर गेल्या आठवड्यात मी त्याला नॉमिनेट केलं नसतं. विकीवर माझा पूर्ण विश्वास नाही. पण होय, मी कॅमेरासाठी मी कधीच त्याचा हात पकडला नव्हता.” ‘बिग बॉस 17’च्या विजेतेपदाचा किताब अंकिता लोखंडेनं जिंकावा अशीही इच्छा तिने बोलून दाखवली. बिग बॉसच्या घरात अंकिताने नेहमी माझी साथ दिली, असंही ती म्हणाली.
View this post on Instagram
कोण आहे सना?
सना ही मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करणारी क्रिमिनल ॲड्वोकेट आहे. तिने अनेक हाय-प्रोफाइल केसेसमध्ये आरोपींचं प्रतिनिधित्व केलं आहे. सनाने कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणात आरोपी अवीन साहूचं प्रतिनिधित्व केलं होतं. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानलाही या प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली होती. याशिवाय शिना बोरा हत्येप्रकरणात सनाने मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीचं प्रतिनिधित्व केलं होतं. काही रिपोर्ट्सनुसार तिने हिंदू गोवंश रक्षा समिती आणि सनातन संस्थेचे सदस्य वैभव राऊत यांचंही प्रतिनिधित्व केलं होतं. 2018 च्या नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणात ते आरोपी होते.