Sanjay Dutt | तुरुंगात काय काय केलं? बऱ्याच वर्षांनंतर संजय दत्तकडून खुलासा
अभिनेता संजय दत्त पुण्याच्या येरवडा तुरुंगात पाच ते सहा वर्षे होता. या कालावधीत त्याने बऱ्याच गोष्टी शिकल्या. तुरुंगातील दिवस कसे होते, याविषयी तो नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त झाला. संजय दत्तची ही मुलाखत चर्चेत आली आहे.
मुंबई | 6 ऑक्टोबर 2023 : अभिनेता संजय दत्त लवकरच आगामी ‘लिओ’ या तमिळ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संजू बाबा आता चित्रपटसृष्टीत ‘खलनायक’ बनून प्रेक्षक-समिक्षकांकडून दाद मिळवतोय. बॉलिवूड असो किंवा टॉलिवूड, संजय दत्तच्या भूमिका सध्या चांगल्याच गाजत आहेत. ‘केजीएफ 2’, ‘शमशेरा’नंतर आता संजू बाबा साऊथ सुपरस्टार विजय थलपतीच्या ‘लिओ’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत संजय दत्त तुरुंगातील दिवसांबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला. 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांशी संबंधित शस्त्रे बाळगल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. या अटकेनंतर त्याला पाच वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा झाली आणि त्यावेळी तो पुण्याच्या येरवडा तुरुंगात होता.
तुरुंगातील दिवस
संजय दत्त म्हणाला, “तुम्ही जर माझे फोटो पाहिले असतील तर पहिल्यांदा जेव्हा मी तुरुंगात जात होतो, तेव्हा तिथे अन्ना (सुनील शेट्टी), अक्षय कुमार, अजय देवगण, शाहरुख खान हे सर्वजण मला भेटायला आले होते. मला शिक्षेपासून सूट मिळाली नव्हती. त्यामुळे मी फार विचार केला नाही. मी स्वत:ची मानसिक तयारी केली आणि त्या परिस्थितीला सामोरं गेलो. मला यातून जावंच लागेल, असं म्हणत मी ते दिवस काढले होते. त्या सहा वर्षांत माझ्यासमोर जे काही आलं, त्याला मी सामोरं गेलो, वेळेचा सदुपयोग केला आणि त्यातून बरंच काही शिकलो.”
तुरुंगात काय काय शिकला?
संजय दत्तने पुढे हेसुद्धा सांगितलं की तुरुंगात असताना तो जेवण बनवायला शिकला, विविध धर्मग्रंथ वाचले आणि वर्कआऊट करून शारीरिक स्वास्थ्यावर लक्ष केंद्रीत केलं. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर शारीरिकरित्या उत्तम होतो, असंही तो पुढे म्हणाला. संजू बाबा नुकताच शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटात झळकला होता. त्याआधी त्याने शमशेरा, सम्राट पृथ्वीराज, केजीएफ- चाप्टर 2 यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत.
संजय दत्त गेल्या काही वर्षांपासून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत लोकप्रियता मिळवतोय. लिओ या तमिळ चित्रपटानंतर त्याच्या हाती आणखी दोन-तीन दाक्षिणात्य चित्रपटांचे प्रोजेक्ट्स आहेत. त्याशिवाय मल्टीस्टारर ‘हाऊसफुल 5’मध्येही तो महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.