सैफ अली खानवरील चाकूहल्ल्याप्रकरणी लेक साराने सोडलं मौन; म्हणाली “ज्या वडिलांना मी गेल्या..”
अभिनेता सैफ अली खानवर जानेवारी महिन्यात एका चोराने चाकूहल्ला केला होता. सैफच्या शरीरावर सहा जखमा झाल्या होत्या, त्यापैकी दोन गंभीर स्वरुपाच्या होत्या. सैफच्या पाठीत चाकूचा तुकडा शिरला होता. या घटनेबद्दल आता सारा अली खान पहिल्यांदाच व्यक्त झाली आहे.

या वर्षाच्या सुरुवातीलाच अभिनेता सैफ अली खान आणि त्याच्या कुटुंबीयांवर मोठं संकट ओढावलं होतं. सैफच्या राहत्या घरी त्याच्यावर एका चोराने चाकूहल्ला केला होता. त्यानंतर पाच दिवस सैफवर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याच्यावर शस्त्रक्रिया करून पाठीत घुसलेला अडीच इंचाचा चाकूचा तुकडा डॉक्टरांनी बाहेर काढला होता. याप्रकरणी आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याला पोलिसांनी अटक केली असून सध्या तो तुरुंगात आहे. आता याप्रकरणी दोन महिन्यांनंतर सैफची मुलगी सारा अली खानने प्रतिक्रिया दिली आहे.
सारा अली खानची प्रतिक्रिया
‘एनडीटीव्ही युवा’ला दिलेल्या मुलाखतीत सारा म्हणाली, “तुम्ही ज्या गोष्टींचा पाठलाग करता त्या किती क्षणभंगुर असतात हे तुम्हाला जाणवून देण्याबद्दलचं आहे. त्या घटनेनं मला याची जाणीव करून दिली नाही की ज्या वडिलांना मी गेल्या 29 वर्षांपासून ओळखते, त्यांच्यावर किती प्रेम करते? परंतु मला याची जाणीव झाली की आयुष्य एका रात्रीत बदलू शकतं. म्हणूनच प्रत्येक दिवसाचा प्रत्येक सेकंद जाणीवपूर्वक साजरा करायला हवा. त्यामुळे मला फक्त कृतज्ञ राहण्याचं महत्त्व कळलं.”
सैफवरील हल्ल्याच्या घटनेनंतर कुटुंबातील गोष्टी कशा पद्धतीने बदलल्या याविषयीही साराने सांगितलं. “गोष्टी आणखी वाईट घडू शकल्या असत्या. त्यामुळे संपूर्ण कुटुंबीयांच्या मनात आता फक्त कृतज्ञता आहे. सर्वकाही ठीक आहे यासाठी मीसुद्धा कृतज्ञ आहे”, असं सारा पुढे म्हणाली.




सैफच्या घरी नेमकं काय घडलं होतं?
16 जानेवारी 2025 रोजी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास सैफवर एका चोराने हल्ला केला होता. चोरीच्या उद्देशाने आलेला आरोपी आधी तैमुर आणि जहांगीरच्या खोलीस शिरला होता. त्याला जेव्हा नॅनीने पाहिलं तेव्हा तिने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. या आवाजाने सैफ जागा झाला आणि मुलांच्या खोलीत गेला. चोराने सैफकडे आधी पैशांची मागणी केली. तेव्हा सैफने चोरापासून आधी मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत आरोपीने सैफवर चाकूने सहा वार केले. त्यापैकी दोन वार खोलवर होते.