Sara Ali Khan | खजराना गणेश मंदिरात पोहोचली सारा अली खान; दर्शनानंतर नव्या वादाला फुटलं तोंड
चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी ती महाकालेश्वर मंदिरात दर्शनासाठी आली होती. आता चित्रपट हिट झाल्यानंतर देवाचे आभार मानण्यासाठी ती पुन्हा मंदिरात आली. मात्र साराच्या गणेश मंदिराच्या दर्शनावरून नवीन वाद निर्माण झाला आहे.
इंदूर : अभिनेत्री सारा अली खानला देवावर फार श्रद्धा आहे. म्हणूनच कधी तिला मंदिरात, कधी गुरुद्वारामध्ये तर कधी दर्ग्यात पाहिलं जातं. साराच्या या श्रद्धेवरून अनेकदा वादसुद्धा झाला आहे. काही दिवसांपूर्वी जेव्हा ती उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात दर्शनासाठी पोहोचली, तेव्हा तिच्यावर काही जणांकडून जोरदार टीका झाली होती. मात्र या टीकेला न जुमानता साराने सडेतोड उत्तर दिलं होतं. आता नुकतीच सारा पुन्हा एकदा उज्जैनच्या महाकाल मंदिरात आणि इंदूरच्या खजराना गणेश मंदिरात दर्शनासाठी पोहोचली. यावेळी तिने गणेश मंदिरात देवाची पूजा-अर्चना केली. तर महाकाल मंदिरात शंकराची आराधना करतानाचा तिचा व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
सारा अली खानचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘जरा हटके जरा बचके’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. यामध्ये तिने अभिनेता विकी कौशलसोबत भूमिका साकारली. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी ती महाकालेश्वर मंदिरात दर्शनासाठी आली होती. आता चित्रपट हिट झाल्यानंतर देवाचे आभार मानण्यासाठी ती पुन्हा मंदिरात आली. मात्र साराच्या गणेश मंदिराच्या दर्शनावरून नवीन वाद निर्माण झाला आहे.
View this post on Instagram
साराने खजराना गणेश मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करून विशेष पूजा केली. यावरून काँग्रेसने आरोप करत भाजपा सरकारवर टीका केली आहे. काँग्रेस प्रवक्ते नीलाभ शुक्ला यांनी भाजपावर प्रश्न उपस्थित करत सांगितलं की खजराना गणेश मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करण्यास सक्त मनाई आहे. मात्र चित्रपटातील कलाकार आणि विशेष व्हीआयपी लोकांना गर्भगृहात प्रवेश दिला जातो. जर सर्वसामान्य लोकांना तिथे प्रवेश करण्यास मनाई आहे तर सेलिब्रिटींना परवानगी का द्यावी, असा सवाल त्यांनी केला आहे.
टीका करणाऱ्यांना साराचं सडेतोड उत्तर
इंदौर दौऱ्यावर असताना साराला मंदीर दर्शनावरून होत असलेल्या ट्रोलिंगविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ती म्हणाली होती, “मी माझं काम खूप गांभीर्याने करते. मी लोकांसाठी काम करते, तुमच्यासाठी करते. जर तुम्हाला माझं काम आवडलं नाही तर मला कदाचित वाईट वाटू शकेल पण माझी वैयक्तिक श्रद्धा ही माझी स्वत:ची आहे. मी त्याच भक्तीने अजमेर शरीफला जाईन ज्या श्रद्धेने मी बांगला साहेब गुरुद्वारा किंवा महाकालला जाते. अशा ठिकाणांना मी भेट देत जाईन. लोकांना जे बोलायचं ते बोलू द्या, मला त्याने फरक पडत नाही. तुम्हाला त्या जागेची ऊर्जा आवडणं गरजेचं असतं, मला त्या ऊर्जेवर विश्वास आहे.”