Satish Kaushik | सतीश कौशिक यांचं निधन कशामुळे? पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये कारण झालं स्पष्ट
सतीश कौशिक यांच्या पार्थिवावर गुरुग्राममध्ये शवविच्छेदन पार पडलं. त्याचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार त्यांचं निधन हृदयविकाराच्या झटक्याने झालं. त्यांच्या शरीरावर इतर कोणतेच निशाण डॉक्टरांना दिसले नाहीत.
मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते सतीश कौशिक यांचं आज (गुरुवार) निधन झालं. परवाच (7 मार्च) मुंबईतील जुहू परिसरात त्यांनी होळीच्या पार्टीला हजेरी लावली होती. या पार्टीचे फोटोसुद्धा त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले होते. होळीच्या पार्टीनंतर दुसऱ्या दिवशी ते गुरुग्रामसाठी रवाना झाले. मात्र एनसीआरमध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला. कारमध्ये असताना त्यांना हार्ट अटॅक आला. रुग्णालयात दाखल केलं असता त्यांना मृत घोषित करण्यात आलं. गुरुग्राममध्येच शवविच्छेदन पार पडलं असून त्याचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे.
सतीश कौशिक यांच्या प्राथमिक शवविच्छेदन अहवालानुसार त्यांचं निधन हृदयविकाराच्या झटक्याने झालं आहे. डॉक्टरांना त्यांच्या शरीरावर कोणतेच निशाण दिसले नाहीत. सतीश कौशिक यांच्या निधनप्रकरणी नेहमीप्रमाणे सीआरपीसीच्या कलम 174 अंतर्गत तपास सुरू केला आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. दिल्लीच्या दीन दयाल उपाध्याय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं.
सतिश कौशिक यांच्या पार्थिवाला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईत आणलं जाईल, अशी माहिती ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी दिली. त्यांच्या पार्थिवावर आजच अंत्यसंस्कार करण्यात येतील, असंही त्यांनी सांगितलं. मात्र सूर्यास्ताआधी सर्वकाही झालं, तर हे शक्य होईल, असंही खेर म्हणाले.
Colourful Happy Fun #Holi party at Janki Kutir Juhu by @Javedakhtarjadu @babaazmi @AzmiShabana @tanviazmi.. met the newly wed beautiful couple @alifazal9 @RichaChadha.. wishing Happy Holi to everyone ??????? #friendship #festival #Holi2023 #colors pic.twitter.com/pa6MqUKdku
— satish kaushik (@satishkaushik2) March 7, 2023
सतीश कौशिक हे दोन दिवसांपूर्वी बॉलिवूड इंडस्ट्रीतील मित्रमैत्रिणींसोबत होळी साजरी करत होते. जावेद अख्तर, रिचा चड्ढा, अली फजल आणि महिमा चौधरी यांच्यासोबत होळी खेळतानाचे फोटो त्यांनी ट्विटरवर पोस्ट केले होते. “आज सकाळीच मला त्यांच्या निधनाची बातमी समजली. हे खूपच धक्कादायक होतं, कारण एक दिवसआधीच आम्ही होळी खेळलो होतो. हे सर्व अजूनही अविश्वसनीय आहे. त्यादिवशी ते खूप खुश होते आणि प्रत्येकासोबत एंजॉय करत होते. अचानक दुसऱ्या दिवशी जेव्हा असं काही घडतं, तेव्हा त्यावर विश्वास बसत नाही. आयुष्य किती नाजूक आहे, याची जाणीव आपल्याला होते. एखाद्या व्यक्तीसोबत तुमची शेवटची भेट ठरू शकते. ते जेव्हा पार्टीतून जात होते, तेव्हा मी त्यांना मिठी मारली होती”, अशी प्रतिक्रिया महिमा चौधरीने दिली.