Scam 2003 : The Telgi Story Review | ‘स्कॅम 2003’चा अचूक पर्दाफाश; तेलगी घोटाळ्याची सीरिज पाहण्याजोगी
सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'स्कॅम 2003 : द तेलगी स्टोरी' ही नवी वेब सीरिज प्रदर्शित झाली आहे. तेलगी स्टॅम्प घोटाळ्याची कथा यामध्ये दाखवण्यात आली आहे. हंसल मेहता यांची ही सीरिज कशी आहे ते जाणून घेऊयात..
मुंबई | 1 सप्टेंबर 2023 : ‘स्कॅम 1992’च्या प्रचंड यशानंतर आता निर्माते हंसल मेहता ‘स्कॅम 2003′ ही नवी वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आले आहेत. सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आज (1 सप्टेंबर) ही सीरिज प्रदर्शित झाली. ज्या घोटाळ्याने संपूर्ण देशाच्या न्यायवस्थेला हादरवून टाकलं होतं, त्याचीच कथा यामध्ये दाखवण्यात आली आहे. अभिनेता गगन देव रियारने यामध्ये अब्दुल करीम तेलगीची मुख्य भूमिका साकारली आहे. तेलगी स्टॅम्प घोटाळ्यावर आधारित या सीरिजमध्ये बऱ्याच मराठी कलाकारांची वर्णी लागली आहे. ही सीरिज कशी आहे ते जाणून घेऊयात..
‘स्कॅम 2003’ची कथा
‘स्कॅम 2003’ या सीरिजची कथा कर्नाटकमधल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या अब्दुल करीम तेलगीची आहे. तेलगीचे वडील भारतीय रेल्वेत कर्मचारी होते. वडिलांच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळतो. हलाखीच्या परिस्थितीत तो कसंबसं पदवीपर्यंतचं आपण शिक्षण पूर्ण करतो. मात्र शिक्षण झाल्यावर त्याला नोकरी मिळत नाही. अखेर ट्रेनमध्ये फळं विकत तो घराचा गाडा चालवतो. अखेर एके दिवशी ट्रेनमध्येच त्याची भेट एका असा व्यक्तीशी होते, जो त्याला मुंबईत येण्याची ऑफर देतो.
छोट्याशा घरात राहणारा तेलगी आयुष्याबद्दल खूप मोठमोठी स्वप्नं पाहू लागतो. हीच स्वप्नं पूर्ण करण्यासाठी तो मुंबईला येतो. मुंबईत आल्यावर तो त्या सेठच्या हॉटेलमध्ये काम करू लागतो. तेलगीकडे पैसे नव्हते, मात्र तो खूप हुशार होता. हॉटेलमध्ये काम करता करता तो दुबईची वाट धरतो. दुबईमध्ये सात वर्षे राहिल्यानंतर पत्नी आणि मुलांखातर तो भारतात परततो. भारतात आल्यानंतर तेलगी बनावट कागदपत्रांच्या आधारे तरुणांना दुबईत पाठवण्याचं काम करतो. याप्रकरणी त्याला अटकसुद्धा होते. तेव्हा तुरुंगात त्याची भेट एका अशा अपराधीशी होते, जो त्याच्याच सारखा खुरापती आहे. हे दोघं तुरुंगातून बाहेर आल्यानंतर बनावट स्टॅम्प पेपर विकण्याचं काम सुरू करतात. या कामात जोखीम असल्याचं तेलगीला पुरेपूर ठाऊक असतं. तरीसुद्धा श्रीमंत होण्यासाठी तो हा जोखमीचा खेळ खेळू लागतो. मात्र कोणताही बिझनेस हा सरकारी कर्मचारी आणि नेत्यांशिवाय मोठा होत नाही. तेलगीसुद्धा त्याच्या या घोटाळ्यात अशा लोकांची मदत घेतो आणि पुढे जातो. यापुढे नेमकं काय काय होतं, हे तुम्हाला सीरिजमध्ये पहायला मिळेल.
का पहावी सीरिज?
‘स्कॅम 2003’ ही एकूण दहा एपिसोड्सची वेब सीरिज आहे. त्यापैकी आता फक्त पाच एपिसोड्स प्रदर्शित झाले असून इतर पाच नोव्हेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहेत. मात्र पहिले पाच एपिसोड्स पाहिल्यानंतर हे लक्षात येतं की ही अशा सीरिजपैकी एक आहे, ज्याला आवर्जून पाहिलं पाहिजे. एक गरीब व्यक्ती संपूर्ण देशाला तब्बल 30 हजार कोटी रुपयांचा चुना लावतो. त्याची कथा जाणून घेण्यासाठी तुम्हीही उत्सुक व्हाल. पहिल्या एपिसोडच्या सुरुवातीलाच तेलगीची नार्को टेस्ट होते. हा सीनच तुम्हाला पुढील एपिसोड पाहण्यासाठी आतूर करेल.
विषयाच्या खोलवर जाऊन उत्तम दिग्दर्शन
‘स्कॅम 2003’ या सीरिजचा ट्रेलर जेव्हा प्रदर्शित झाला, तेव्हा प्रत्येकाच्या मनात हाच सवाल होता की निर्माते हंसल मेहता या घोटाळ्याच्या किती खोलवर जाऊ शकतील. मात्र सीरिजने या प्रश्नांची उत्तरं स्पष्टपणे दिली आहेत. हंसल मेहता हे कथेबाबत संपूर्ण संशोधन करून त्याची प्रत्येक बाजू दाखवतात. हेच या सीरिजबद्दलही पहायला मिळतं. यामध्ये प्रत्येक मुद्दा खोलवर जाऊन दाखवण्यात आला आहे. या सीरिजचं दिग्दर्शन तुषार हिरानंदानी यांनी केलं आहे. त्यांनी प्रत्येक भूमिकेवर बारकाईने मेहनत घेतली आहे.
कलाकारांचं उत्कृष्ट अभिनय
अब्दुल करीम तेलगीच्या भूमिकेतील गगन देव रियार तुम्हाला थक्क करतो. या भूमिकेला त्याने पूर्ण न्याय दिला आहे. तेलगीच्या व्यक्तीरेखेला त्यांनी हुबेहूब कॉपी केलं आहे. असं असूनही ते अभिनय करत आहेत, असा भास कधीच होत नाही. तेलगीच्या भूमिकेतील प्रत्येक गोष्ट त्यांनी बारकाईने आपल्या अभिनयातून अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे.