‘जलसे’ जिवंत राहण्याची तळमळ, शाहिरीत नवे प्रयोग; वाचा, शाहीर इंगळे आणि त्यांची जडणघडण
शाहीर डी. आर. इंगळे यांनी शाहिरीचा पारंपारिक बाज जिवंत ठेवला. (Shahir D.R. Ingle has kept alive Shahiri in today's times)
मुंबई: शाहीर डी. आर. इंगळे यांनी शाहिरीचा पारंपारिक बाज जिवंत ठेवला. पण ते करताना शाहिरीत नवे प्रयोगही केले. काळानुसार लोकांना भावतील असे विषय त्यांनी शाहिरीत आणले. तसेच महापुरुषांचे जीवनकार्यही लोकांसमोर मांडलं. शाहिरांचा सतत नवं काही करण्याचा ध्यास आणि तळमळीचा घेतलेला हा आढावा. (Shahir D.R. Ingle has kept alive Shahiri in today’s times)
भैय्यासाहेबांसमोर गॅदरिंग गाजवली
आंबेडकर कॉलेजात असताना शाहीर डी. आर. इंगळे यांनी कॉलेजच्या गॅदरिंगही गाजवल्या आहेत. त्यावेळी त्यांना आर. पी. नाथ नावाचे प्राचार्य होते. एकदा कॉलेजच्या गॅदरिंगला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र आणि रिपब्लिकन नेते भैय्यासाहेब आंबेडकर आले होते. साक्षात बाबासाहेबांचे सुपुत्र आल्याने त्यांनी भैय्यासाहेबांसमोर बाबासाहेबांचा पोवाडा गाऊन गॅदरिंग गाजवली होती. तो पोवाडा होता,
धन्य धन्य बाबा भीमराव, गाजविले नाव, अजरामर किर्ती नांदे गगनात, तयाला तोड नसे जगतात, जी… जी… जी…
लग्नामुळे शिक्षण अर्धवट सोडावं लागल्यानंतर शाहीर इंगळेंनी अकोला येथे समाजकल्याण खात्यात नोकरी सुरू केली. अकोल्यात तीन वर्षे नोकरी केल्यानंतर 1981ला ते खामगावात आले. 2007मध्ये ते महिला बाल विकास खात्यातून अकाऊंटंट म्हणून निवृत्त झाले आहेत. नोकरी सुरू असतानाही त्यांचे शाहिरी कार्यक्रम सुरूच होते. अकोल्यात पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात सांस्कृतिक स्पर्धा होत्या. त्या स्पर्धेत त्यांनी पहिला क्रमांक पटकावला. त्यावेळचे कृषीमंत्री भुयार यांनी त्यांना बक्षीस देऊन गौरवले होते.
थोर महर्षी जन्मा आला, विदर्भ भूमीमधी, घेऊन गेला घराघरात, ज्ञानाची ही नदी…
त्यांनी गायलेलं हे गाणं परीक्षकांना बेहद पसंत पडलं होतं. त्याच काळात भादुल्यात ते गवई-मिसाळ यांच्या कलापथकात सामिल झाले. गवई-मिसाळ कलापथकात ते ढोलकी वाजवण्याबरोबरच निवेदनही करायचे.
पहिले शाहीर
1985 पासून ते जळगाव आकाशवाणीचे अधिकृत कलाकार म्हणून कार्यक्रम करतात. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या तंटामुक्त गाव योजनेचा आकाशवाणीवर पहिला लोकसंगीताचा कार्यक्रम करणारे ते महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव शाहीर आहेत.
जलसा जिवंत राहावा
इंगळे यांचा आंबेडकरी जलशांचा गाढा अभ्यास आहे. हे जलसे अलिकडे लोप पावत चालल्याची खंत ते व्यक्त करतात. आता बोटावर मोजण्या इतकेच जलसे राहिले असून जलसे जगले पाहिजे असे ते सांगतात. गायनपार्ट्या उदंड झाल्या आणि रात्री 10 नंतर कार्यक्रम करण्यास मनाई झाल्याने जलसे लोप पावत असल्याचं ते सांगतात. हे जलसे जिवंत राहावे, हा सांस्कृतिक ठेवा जतन व्हावा म्हणून आंबेडकरी जलसा करत असल्याचं ते स्पष्ट करतात. शाहिरी टिकावी आणि काळाबरोबर त्याचं महत्त्व अधोरेखित राहावं म्हणून त्यांनी शाहिरीत सातत्याने नवनवे प्रयोग केले आहेत. ज्या विषयाला कोणत्याही शाहिरांनी हात घातला नाही, असे विषय ते पोवाड्याचा विषय बनवतात. सतत नवीन काही करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. म्हणूनच ते केवळ छत्रपती शिवाजी महाराज आणि आंबेडकरांवरच पोवाडे गात नाहीत. तर राजमाता जिजाऊ आणि प्रबोधनकार ठाकरेही त्यांच्या शाहिरीचा विषय होतात.
इंगळे यांचे पोवाडे
मायभवानी, कुलस्वामिनी, जिजाऊ रुपे लाभली, दोधारी तलवार तिनं शिवरायाच्या हाती दिली…
आणि
या मातीच्या कणाकणांतून क्रांतीचा हुंकार, महाराष्ट्राचा करूया जयजयकार…
आणि
पहिला माझा शाहिरी मुजरा, आई जिजाऊपदी, महाराष्ट्राची माय जन्मली, सिंदखेड राजामधी, असं घडलंच नाही कधी, असं घडणार नाही कधी, भारतामधी जी… जी… जी… (साभार, आंबेडकरी कलावंत) (Shahir D.R. Ingle has kept alive Shahiri in today’s times)
संबंधित बातम्या:
जिजामाता महोत्सवात ‘शाहीर’ म्हणून उदय; वाचा, शाहीर डी. आर. इंगळेंची कहाणी
(Shahir D.R. Ingle has kept alive Shahiri in today’s times)