Shah Rkh khan चा ‘जवान’ प्रदर्शनापूर्वीच मालामाल; दहा, वीस नाही तर, ५६४ कोटी आले तरी कसे?
'पठाण' सिनेमानंतर शाहरुख खान याचा 'जवान' देखील ठरणार ब्लॉकबास्टर? प्रदर्शनापूर्वीच 'जवान' सिनेमाने कसे कमावलं ५६४ कोटी रुपये? सर्वत्र सिनेमाची चर्चा...
मुंबई | 25 जुलै 2023 : अभिनेता शाहरुख खान याने ‘पठाण’ सिनेमाच्या मध्यमातून मोठ्या पडद्यावर तब्बल चार वर्षांनंतर पुन्हा पदार्पण केलं. चार वर्षांनंतर किंग खान याला पाहण्यासाठी चाहत्यांनी देखील चित्रपटगृहात मोठी गर्दी केली. फक्त भारतातच नाही तर, जगभरात शाहरुख खान याच्या ‘पठाण’ सिनेमाने बाजी मारली आणि शाहरुख पुन्हा ‘बादशहा’ ठरला. आता शाहरुख ‘जवान’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. नुकताच सिनेमाचा प्रिव्ह्यू प्रदर्शित करण्यात आला. सिनेमाच्या प्रिव्ह्यूला देखील चाहत्यांनी पसंती दर्शवली. प्रेक्षक ट्रेलर आणि सिनेमाच्या प्रतीक्षेत आहे. ‘जवान’ सिनेमाच्या माध्यमातून शाहरुख याचा नवा अंदाज चाहत्यांना अनुभवता येणार आहे.
शाहरुख खान म्हटलं तर, किंग खान याला पाहण्यासाठी असंख्य चाहते ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’साठी उत्सुक असतील. पण ‘जवान’ सिनेमा प्रदर्शनापूर्वीच मालामाल झाला आहे. सिनेमा प्रदर्शनापूर्वी दहा वीस नाही तर तब्बल ५६४ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. आता सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
रिपोर्टनुसार, ‘जवान’ सिनेमाला प्रदर्शनापूर्वी १५० कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. ट्रेड विश्लेषक मोहनबाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिनेमाच्या नॉन थिएट्रिकल राईट्ल जवळपास २५० कोटी रुपयांमध्ये विकण्यात आले आहेत. ज्यामध्ये सॅटेलाईट राइट्स ८४ कोटी, डिजिटल राईट्स १३० कोटी, म्युझिक राईट्स ३६ कोटी रुपयांमध्ये विकण्यात आले आहेत.
एवढंच नाही तर, ‘जवान’ सिनेमाचे थिएट्रिकल राईट्स ३१४ कोटी मध्ये विकण्यात आले आहेत. ज्यामध्ये ओव्हरसीज १०५ कोटी रुपये, तामिळनाडू याठिकाणी १७ कोटी, आंध्र प्रदेश याठिकाणी १५ कोटी, कर्नाटक मध्ये १५ कोटी तर केरळमध्ये ७ कोटी रुपयांमध्ये सिनेमाचं राईट्स विकण्यात आले आहेत. ज्यामुळे शाहरुख खान याच्या ‘जवान’ सिनेमाला मोठा फायदा झाला आहे.
‘जवान’ सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वीच्या कमाईबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमाने ५६४ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. सिनेमाच्या दमदार कमाईमुळे निर्माते आनंदी आहेत. रिपोर्टनुसार शाहरुख याचा सिनेमा प्रदर्शनापूर्वीच ब्लॉकबास्टर ठरला आहे. सिनेमाच्या प्रदर्शनाबद्दल सांगायचं झालं तर ‘जवान’ ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
सिनेमात शाहरुख खान याच्यासोबत अभिनेत्री दीपिका पादुकेण, नयनतारा मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक आणि अभिनेता विजय सेतुपती देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘जवान’नंतर शाहरुख ‘डंकी’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सध्या सर्वत्र किंग खान याच्या आगामी सिनेमांची चर्चा सुरु आहे.