Marathi News Entertainment Shanaya Kapoor argues with security at Anant Ambani and Radhika Merchants wedding while bag checking process netizens reacts
अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्यातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एक स्टारकिड सुरक्षारक्षकांसोबत हुज्जत घालताना दिसतेय. त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्याला असंख्य बॉलिवूड सेलिब्रिटींची उपस्थिती पहायला मिळाली. इंडस्ट्रीतील दिग्गज कलाकारांपासून नवोदित स्टारकिड्सपर्यंत अनेकजण या लग्नसोहळ्यात सहभागी झाले होते. यादरम्यान एका अभिनेत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती अभिनेत्री बॅग चेकिंगदरम्यान सुरक्षारक्षकांसोबत हुज्जत घालताना दिसतेय. त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेते संजय कपूर आणि महीप कपूर यांची मुलगी शनाया कपूरचा हा व्हिडीओ आहे. अनंत-राधिकाच्या विवाहस्थळी सुरक्षारक्षकांसोबत ती रागाने बोलताना दिसून येत आहे. सुरक्षा रक्षकांनी शनायाची बॅग तपासली, त्यावरून हा वाद झाल्याचं कळतंय.
अंबानींच्याविवाहस्थळी उपस्थित असलेल्या एका टिकटॉक युजरने हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. सुरक्षारक्षकांनी शनायाची बॅग तपासण्याची विनंती केली. त्यावरून तिने हा वाद सुरू केल्याचा दावा संबंधित युजरने केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये शनाया सिक्युरिटी गार्डशी भांडताना दिसून येत आहे. यात तिची बॅगसुद्धा पहायला मिळतेय. या व्हिडीओवरून नेटकऱ्यांनी शनायाला ट्रोल केलंय.
‘0 टक्के चित्रपट आणि 100 टक्के ॲटिट्यूड’, असं एकाने लिहिलं. तर ‘अद्याप तुझ्या करिअरची सुरुवातसुद्धा झाली नाही. ते सुरक्षा रक्षक तुझ्याकडे लक्ष तरी देतायत, त्याचे आभार मान’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘तू अजून बॉलिवूडमध्ये पदार्पणसुद्धा केलं नाहीस, असं वागणं बरं नाही’, असाही सल्ला नेटकऱ्यांनी शनायाला दिला आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्रत्येक प्री-वेडिंग फंक्शन्सना शनाया उपस्थित होती. या वर्षाच्या सुरुवातीला जामनगरमध्ये पार पडलेलं प्री-वेडिंग, त्यानंतर युरोपमध्ये आलिशान क्रूझवरील पार्टी आणि आता लग्नापूर्वी पार पडलेल्या सर्व कार्यक्रमांमध्ये शनायाला ग्लॅमरस अंदाजात पाहिलं गेलं. शनाया ही अभिनेते अनिल कपूर आणि निर्माते बोनी कपूर यांची भाची आहे. तर जान्हवी कपूर, खुशी कपूर, सोनम कपूर आणि अर्जुन कपूर यांची ती चुलत बहीण आहे.
शनाया ही करण जोहरच्या प्रॉडक्शन अंतर्गत ‘बेधडक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होती. यामध्ये तिच्यासोबत लक्ष्य आणि गुरफतेह पिरजादा यांच्या मुख्य भूमिका होत्या. 2022 मध्येच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. मात्र त्यानंतर त्याचे काहीच अपडेट्स समोर आले नाहीत.