19 वर्षांच्या अभिनेत्रीवर 46 वर्षीय अभिनेता फिदा; चाहत्यांनी डोक्याला लावला हात, म्हणाले ‘होकार तरी का दिला?’
'तुम से तुम तक' ही मालिका 'तुला पाहते रे' या मराठी मालिकेचा हिंदी रिमेक असल्याचं म्हटलं जातंय. प्रतीक शर्मा या मालिकेचं दिग्दर्शन करणार असून ही मालिका झी टीव्हीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अभिनेता शरद केळकर हा टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने बॉलिवूडमध्येही काम केलंय. आता आठ वर्षांनंतर तो छोट्या पडद्यावर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘तुम से तुम तक’ या मालिकेतून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एकीकडे शरदच्या पुनरागमनासाठी चाहते उत्सुक आहेत, तर दुसरीकडे या मालिकेच्या लव्ह-अँगलवरून काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. यामध्ये शरदसोबतच अभिनेत्री निहारिका चौकसी मुख्य भूमिका साकारतेय. या दोघांच्या वयातील अंतरामुळेच चाहते प्रश्न उपस्थित करत आहेत. एकीकडे शरद 46 वर्षांचा आहे तर निहारिका ही केवळ 19 वर्षांची आहे. दोघांच्या वयात इतकं अंतर असताना त्यांच्याच रोमँटिक रिलेशनशिप दाखवल्याने नेटकऱ्यांनी सवाल केला आहे.
या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. यामध्ये 19 वर्षीय निहारिकाला मध्यमवर्गीय मुलगी दाखवली आहे. तिला एका चांगल्या कमावणाऱ्या मुलाशी लग्न करण्याची इच्छा असते. तिची भेट 46 वर्षीय श्रीमंत बिझनेसमन शरदशी करून दिली जाते. शरद खाजगी चॉपरने प्रवास करतो आणि त्याला महागड्या गाड्यांचा शौक असतो. परंतु या दोघांमध्ये प्रेमाचीच कमतरता जाणवते. जसजसा वेळ जातो, तसं हे दोघं एकमेकांवर प्रेम करू लागतात. निहारिका शरदला तिच्या जोडीदाराच्या दृष्टीकोनातून पाहू लागते.




View this post on Instagram
मालिकेच्या कथानकाबाबत अनेकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे. 27 वर्षांचं अंतर असताना शरद आणि निहारिका यांच्यात रोमँटिक नातं दाखवल्याने प्रेक्षक चक्रावले आहेत. ‘ही लोकं काहीही दाखवतायत. 19 वर्षांची मुलगी आणि 46 वर्षांचा मुलगा.. हे जरा अतिच आहे. मुलाचं वय 35 पर्यंत असतं तरी ठीक असतं. ही जोडी अजिबात आवडली नाही’, असं एकाने लिहिलंय. तर ‘नेहमी मुलगीच का वयाने लहान दाखवली जाते? प्रत्येक वेळी एकच विषय दाखवला जातो’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘शरदने अशा मालिकेला होकार दिला, ही गोष्ट जास्त खटकतेय’, असंही नेटकऱ्यांनी लिहिलं आहे. शरद केळकरकडून अशी अपेक्षा नसल्याचं मत अनेकांनी नोंदवलं आहे. अशा गोष्टींचा प्रचार तरी का करायचा, असाही सवाल प्रेक्षकांचा आहे.