“तिला खेळणं बनवून..”; एकाच वेळी रीना रॉय-पूनमला डेट केल्याची शत्रुघ्न सिन्हा यांची कबुली
शत्रुघ्न सिन्हा आणि रीना रॉय हे 'कालीचरण' या चित्रपटाच्या सेटवर एकमेकांना भेटले. त्यानंतर त्यांनी 'मिलाप', 'संगम', 'सत स्री अकाल', 'चोर हो तो ऐसा' यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र भूमिका साकारल्या होत्या. जेव्हा हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले, तेव्हाच शत्रुघ्न सिन्हा यांनी पूनम यांच्यासोबत लग्न जाहीर केलं होतं.
बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा करिअरच्या शिखरावर असताना एकाच वेळी दोन जणींसोबत रिलेशनशिपमध्ये होते. त्यापैकी एकीशी त्यांनी लग्न केलं तर दुसरीसोबतचं नातं त्यांना संपवावं लागलं होतं. पूनम सिन्हा यांच्याशी लग्न जाहीर केल्यानंतर शत्रुघ्न सिन्हा यांचं नाव सहअभिनेत्री रीना रॉयशी जोडलं गेलं होतं. इतकंच काय तर पूनम यांच्यासोबत लग्नाच्या काही तास आधी शत्रुघ्न लंडनमध्ये रीनासोबत स्टेज शो करत होते. ‘एनिथिंग बट खामोश’ या आपल्या पुस्तकात त्यांनी या घटनेचा उल्लेख केला आहे. आता बऱ्याच वर्षांनंतर त्यांनी एकाच वेळी दोन जणींना डेट केल्याबद्दल अपराधीपणाची भावना व्यक्त केली. “लव्ह ट्रँगलमध्ये फक्त महिलांनाच त्रास होत नाही, तर पुरुषसुद्धा तितक्याच वेदनेतून जात असतो”, असं ते म्हणाले.
‘लेहरे रेट्रो’ला दिलेल्या नुकत्याच एका मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हा यांना त्यांच्या भूतकाळातील रिलेशनशिपबद्दल प्रश्न विचारण्यात आला. मुलाखतकर्ता म्हणाला, “मला आठवतंय जेव्हा तुम्ही मला सांगितलं होतं की तुम्ही एकाच वेळी दोन वेगवेगळ्या बोटींवर पाय ठेवला आहेत.” त्यावर शत्रुघ्न म्हणतात, “दोन वेगवेगळ्या बोट? मी असं म्हणेन की कधीकधी बऱ्याच बोटींवर.. मी नावं घेणार नाही. पण माझ्या आयुष्यात आलेल्या सर्व महिलांसाठी मी कृतज्ञ आहे. माझ्या मनात कोणाही विरोधात कसलाही राग किंवा द्वेष नाही. मी त्यांच्याबद्दल कधीच वाईट विचार करत नाही. त्या सर्वांनी मला आणखी चांगला बनण्यात मदत केली.”
“मी माझ्या आयुष्यात नक्कीच चुका केल्या आहेत. पाटणावरून इंडस्ट्रीच्या ग्लॅमरमध्ये हरवण्यासाठी आलेल्या एखाद्या मुलासाठी ही गोष्ट फार नैसर्गिक आहे. स्टारडमला कसं हाताळायचं हे मला माहीत नव्हतं. या सगळ्यांत लोक हरवून जातात. मला मार्गदर्शन करण्यासाठी सोबत कोणी नव्हतं. पण या सगळ्यानंतर माझ्या आयुष्यात पूनम आली आणि तिने माझी खूप मदत केली”, असं ते पुढे म्हणाले.
View this post on Instagram
प्रेमाच्या त्रिकोणाबद्दल त्यांनी सांगितलं, “मला नावं घ्यायची नाहीत, पण त्या व्यक्तीसोबत माझं जे नातं होतं, त्यासाठी मी खूप कृतज्ञ आहे. मला तिच्याकडून खूप प्रेम मिळालं आणि खूप काही शिकायला मिळालं. माझ्या काहीच तक्रारी नाहीत. जेव्हा एखादा पुरुष चांगल्या मनाचा असतो आणि तो एकाच वेळी दोन रिलेशनशिपमध्ये असतो.. तेव्हा शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या बाबतीत तोसुद्धा बऱ्याच अडचणींचा सामना करतो. तुम्हालाही अपराधीपणा वाटतो. जेव्हा तुम्ही तुमच्या प्रेयसीसोबत बाहेर असता, तेव्हा घरी असलेल्या पत्नीबद्दल तुम्हाला वाईट वाटतं आणि जेव्हा तुम्ही पत्नीसोबत असता, तेव्हा प्रेयसीबद्दल तुम्हाला वाईट वाटतं. तिला खेळणं म्हणून का बनवून ठेवलंय? प्रेमाच्या त्रिकोणात फक्त स्त्रियांनाच नाही तर पुरुषांनाही तितकाच त्रास होतो.”
एका मुलाखतीत शत्रुघ्न यांना लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. “तुम्ही रीना रॉय यांच्यासोबत रोमँटिक रिलेशनशिपमध्ये होता, पण पूनम यांच्याशी लग्न केलं, असं का?”, असा सवाल राजीव शुक्ला यांनी शत्रुघ्न सिन्हा यांना केला होता. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, “आयुष्यात कधी कधी एखादी व्यक्ती अशा टप्प्यावर पोहोचते जिथे निर्णय घेणं खूप कठीण होतं. पण एकदा निर्णय घेतला की तो नेहमीच सर्वांच्या बाजूने नसतो.”