संस्कारांवर प्रश्न होताच सोनाक्षीनंतर शत्रुघ्न सिन्हांनी मुकेश खन्ना यांना केलं ‘खामोश’!
केबीसीमध्ये सोनाक्षी सिन्हाला 'रामायण'बद्दल एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्याचं उत्तर तिला न देता आल्याने मुकेश खन्ना यांनी तिच्यावर टीके केली. इतकंच नव्हे तर तिच्या संगोपनावरही प्रश्न उपस्थित केले. त्यावर आता शत्रुघ्न सिन्हा यांनी उत्तर दिलंय.
‘शक्तीमान’ फेम अभिनेते मुकेश खन्ना यांनी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर चांगलाच वाद निर्माण झाला आहे. 2019 मध्ये अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये सोनाक्षीला रामायणासंदर्भातील प्रश्नाचं उत्तर देता आलं नव्हतं. यावरून मुकेश यांनी सोनाक्षी आणि तिच्या संस्कारांवर प्रश्न उपस्थित केले. रामायणात हनुमान यांनी संजीवनी बूटी कोणासाठी आणली होती, असा प्रश्न सोनाक्षीला शोमध्ये विचारला गेलो होता. त्यावर ती उत्तर देऊ शकली नव्हती. मुकेश खन्ना यांनी यावरून अनेकदा सोनाक्षीवर टीका केली. आता पुन्हा एकदा त्यांनी सोनाक्षीवर टीका करत तिच्या संगोपनावर प्रश्न उपस्थित केला. तेव्हा सोनाक्षीनेही त्यांना सडेतोड उत्तर देण्याचं ठरवलं. सोनाक्षीने तिच्या पोस्टद्वारे मुकेश यांना उत्तर दिल्यानंतर तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांनीसुद्धा मुकेश यांच्यावर टीका केली आहे.
काय म्हणाले शत्रुघ्न सिन्हा?
‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हा हे मुकेश खन्ना यांचं नाव न घेता म्हणाले, “रामायणाशी संबंधित प्रश्नाचं उत्तर सोनाक्षीने न दिल्यामुळे एका व्यक्तीला समस्या असल्याचं मला समजलंय. पहिली गोष्ट म्हणजे रामायणातील सर्व गोष्टींमध्ये तज्ज्ञ होण्यासाठी ही व्यक्ती पात्र आहे का? आणि हिंदू धर्माचं पालक म्हणून त्यांना कोणी नेमलंय? मला माझ्या तिन्ही मुलांवर अभिमान आहे. सोनाक्षी तिच्या स्वत:च्या बळावर स्टार बनली. मी तिला कधीच करिअरमध्ये लाँच केलं नाही. ती अशी मुलगी आहे, जिचा कोणत्याही वडिलांना अभिमानच वाटेल. रामायणाशी संबंधित प्रश्नाचं उत्तर न दिल्याने सोनाक्षी चांगली हिंदू होण्यास अपात्र ठरत नाही. तिला कोणाच्याही मान्यतेच्या प्रमाणपत्राची गरज नाही.”
सोनाक्षीचं सडेतोड उत्तर
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मुकेश खन्ना यांनी सोनाक्षी सिन्हाचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांच्यावर त्यांच्या मुलीला संस्कृती न शिकवल्याबद्दल आरोप केल्यानंतर हा संपूर्ण वाद पुन्हा एकदा चर्चेत आला. मुकेश खन्ना यांना उत्तर देताना सोनाक्षीने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये लिहिलं, ‘मी नुकतंच तुम्ही केलेलं वक्तव्य वाचलं की रामायणाबद्दलच्या प्रश्नाचं मी योग्यरित्या उत्तर न देणं ही माझ्या वडिलांची चूक आहे. खूप वर्षांपूर्वी मी त्या शोमध्ये गेली होती. सर्वांत प्रथम मी तुम्हाला आठवण करून देते की त्यादिवशी हॉटसीटवर दोन महिला होत्या, ज्यांना त्या प्रश्नाचं उत्तर माहित नव्हतं. परंतु तुम्ही फक्त माझंच नाव वारंवार घेत आहात, ज्यामागचा हेतू अगदी स्पष्ट आहे.’
‘होय, त्यादिवशी मी कदाचित विसरले होते की संजीवनी बूटी कोणासाठी आणली होती. विसरणं ही एक मानवी प्रवृत्ती आहे. पण हेसुद्धा तितकंच स्पष्ट आहे की तुम्हीसुद्धा भगवान राम यांनी शिकवलेलं क्षमा आणि क्षमाशीलताचे धडे विसरला आहात. जर प्रभू राम मंथरा यांना माफ करू शकतात, जर ते कैकेयीला माफ करू शकतात, महायुद्ध झाल्यावर रावणालाही माफ करू शकतात, तर त्या तुलनेच ही अत्यंत छोटी गोष्ट तुम्ही नक्कीच माफ करू शकता. मला तुमच्या माफीची गरज नाही. पण चर्चेत राहण्यासाठी तुम्ही माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या नावाखाली तीच घटना वारंवार समोर आणणं थांबवावं आणि विसरून जावं याची नक्कीच गरज आहे. शेवटचं म्हणजे पुढच्या वेळी माझ्या वडिलांनी माझ्यात जी मूल्ये रुजवली आहेत, त्याबद्दल तुम्ही काही बोलायचं ठरवाल तेव्हा कृपया लक्षात ठेवा की त्या मूल्यांमुळेच मी आज अत्यंत आदराने हे सगळं बोलतेय. तेसुद्धा तुम्ही माझ्या संगोपनावर प्रश्न उपस्थित केल्यानंतरही मी आदरपूर्वक हे स्पष्ट करतेय. मी तुम्हाला शुभेच्छा देते’, अशा शब्दांत तिने उत्तर दिलं.