‘हे काही टीव्ही शो नाही..’; पहलगाम हल्ल्यानंतरच्या मुलाखतींवरून भडकली मराठी अभिनेत्री
पहलगाम हलल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रिया माध्यमांमध्ये वारंवार दाखवल्या गेल्या. त्यांना सतत तेच तेच विचारलं गेलं. यावरून मराठमोळ्या अभिनेत्रीने संतप्त पोस्ट लिहिली आहे.

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात 26 पर्यटकांनी आपले प्राण गमावले. या घटनेनंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहित या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. पहलगाममधील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांच्या प्रतिक्रिया सातत्याने माध्यमांसमोर दाखवले जात आहेत. काही कुटुंबीयांच्या मुलाखती घेतल्या गेल्या, तिथे नेमकं काय घडलं होतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलेला असताना त्यांच्याशी वारंवार मुलाखतींसाठी बोलणं, त्यांना तेच तेच प्रश्न विचारणं आणि सतत तेच तेच दाखवणं हे कितपत योग्य आहे, असा सवाल अभिनेत्री शिवानी सुर्वेनं केला आहे. शिवानीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये याविषयीची पोस्ट लिहिली आहे.
शिवानी सुर्वेची पोस्ट-
‘लोकांनी, विशेषत: मीडियाने थोडा विचार करावा. सतत पीडितांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे इंटरव्ह्यू घेणं, पुन्हा पुन्हा तेच विचारणं, एकामागोमाग एक सोलो इंटरव्ह्यू पोस्ट करणं.. हे थांबवलं पाहिजे. हे काही टीव्ही शो नाहीये. हे एखाद्या चॅनलचं टीआरपी वाढवण्याचं साधन नाही. मीडियाने थोडं शहाणपण वापरावं. ज्यांच्यावर हा प्रसंग ओढवला आहे, त्यांना शांतपणे श्वास घेऊ द्या. त्यांच्या आयुष्यात जे घडलंय, ते फार वेदनादायक आहे. आपण त्यांच्या दु:खाचा सन्मान केला पाहिजे, त्यांना त्रास देणं बंद केलं पाहिजे’




पहलगाम हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला. एप्रिल आणि मे महिन्यात काश्मीरला असंख्य पर्यटक फिरायला जातात. ऐन पर्यटनाच्या काळात दहशतवादी हल्ला झाल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. दहशतवाद्यांनी धर्म विचारून पर्यटकांना लक्ष्य केल्याचीही बाब समोर आली आहे. पहलगाममधील बैसरन या पठारावर दहशतवाद्यांनी पर्यटकांना घेरलं. हिंदू आहेस की मुस्लीम.. कलमा वाचून दाखव.. असं विचारून केवळ हिंदूंवर त्यांनी गोळ्या झाडल्या होत्या. बैसरन पठारावर फक्त चालत किंवा पोनी राइडनेच पोहोचता येत असल्याने त्याठिकाणी मदत पोहोचायलाही उशीर लागला. या घटनेनंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दहशतवाद्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी देशवासियांकडून होत आहे.