‘तू पाकिस्तानला जा..’; पहलगाम हल्ल्यानंतरच्या कमेंट्समुळे दुखावला प्रसिद्ध अभिनेता
प्रसिद्ध टीव्ही अभिनेता शोएब इब्राहिमने युट्यूबवर एक व्हिडीओ पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर सोशल मीडियावर त्याला ट्रोल केलं जातंय. तू पाकिस्तानला जा, असे कमेंट्स नेटकरी करत आहेत. याविषयी त्याने दु:ख व्यक्त केलंय.

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशवासियांमध्ये तीव्र संताप आहे. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी या हल्ल्यांचा निषेध केला आहे. त्याचसोबत दहशतवादाविरोधात भारताने कठोर पावलं उचलावीत अशी मागणी देशभरातून होत आहे. प्रसिद्ध टीव्ही अभिनेता शोएब इब्राहिमनेही त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट लिहित हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला होता. ज्या दिवशी पहलगाममध्ये हल्ला झाला, त्याचदिवशी शोएब श्रीनगरहून दिल्लीला पोहोचला होता. शोएब त्याची पत्नी दीपिका कक्कर आणि मुलगा रुहानसोबत जम्मू-काश्मीरला फिरायला गेला होता. श्रीनगरहून दिल्लीला पोहोचल्यानंतर शोएबने युट्यूबवरील व्लॉगद्वारे चाहत्यांना अपडेट्स दिले. परंतु याच व्हिडीओवर नेटकरी नकारात्मक कमेंट्स करत आहेत. तूसुद्धा पाकिस्तानला जा, अशी प्रतिक्रिया नेटकरी करत आहेत. या ट्रोलिंगवर अखेर शोएब व्यक्त झाला आहे.
युट्यूबवर व्लॉग पोस्ट करत शोएब म्हणाला, “काश्मीरमध्ये जो हल्ला झाला, त्यामुळे माझं मन खूप दुखावलंय. आम्हीसुद्धा काश्मीरमध्ये होतो. जगभरात जेव्हा कधी दहशतवादी हल्ला होतो, तेव्हा माणुसकीची मान झुकते. त्याहून अधिक मुस्लिमांचं डोकं झुकतं. जसं की माझं. मलाच या गोष्टीची खूप लाज वाटतेय. दहशतवाद्यांनी धर्म विचारून पर्यटकांना लक्ष्य केलं. त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. त्यांची नावं जरी मुस्लीम असली तरी मी त्यांना मुस्लीम मानत नाही. मी त्यांना माणूस मानत नाही. जे धर्माच्या नावाखाली निरपराध लोकांना मारतात, ते माझ्या लेखी ना माणूस आहेत, ना मुस्लीम.”
“या दहशतवाद्यांना कठोरातली कठोर शिक्षा दिली पाहिजे. काश्मीर आणि काश्मीरच्या लोकांना हे सहन करावं लागू नये. त्या अतिरेक्यांना भर चौकात फाशी दिली पाहिजे. जगासमोर त्यांची चामडी सोलली पाहिजे आणि त्यांना दफन करायला जमीनही देऊ नये. कोणताच धर्म चुकीचा नसतो, माणूस चुकीचा नसतो. काही दहशतवाद्यांमुळे संपूर्ण मुस्लीम समाजाला लक्ष्य केलं जातंय. मला अनेक वाईट गोष्टी ऐकायला मिळत आहेत. तू पाकिस्तानला चालता हो, असे कमेंट्स नेटकरी करत आहेत. पण मी का पाकिस्तानला जाऊ? माझ्या आजोबांनी-वडिलांनी ही जमीन निवडली आहे. आम्ही या जमिनीला दंडवत करतो आणि याच जमिनीत आम्हाला दफन केलं जाईल”, अशा शब्दांत शोएबने भावना व्यक्त केल्या आहेत.