‘नाटू नाटू’ गाण्याने ऑस्कर जिंकल्यानंतर सिद्धार्थ मल्होत्राची अजब प्रतिक्रिया; नेटकऱ्यांनी व्यक्त केला राग
राजामौली यांच्या 'आरआरआर' या चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्याने ऑस्कर पुरस्कार पटकावला. याचं देशभरात कौतुक होत असतानाच अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राची प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.
मुंबई : यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा भारतासाठी खूपच खास ठरला. यावेळी एक नव्हे तर दोन पुरस्कार भारताने आपल्या नावे केले. ए. एस. राजामौली यांच्या RRR चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याने सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या विभागात पुरस्कार पटकावला. तर ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या माहितीपटाने सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्रीच्या ऑस्कर पुरस्कारावर आपलं नाव कोरलं. या दोन्ही विजयानंतर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा ट्विट करत दोन्ही टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राला जेव्हा ऑस्करमधील विजयावर प्रतिक्रिया विचारण्यात आली, तेव्हा वेगळंच घडलं. मुंबई विमानतळावर पापाराझींनी सिद्धार्थचा हा व्हिडीओ शूट केला. मात्र ऑस्करच्या विजयाबद्दल तो अशी प्रतिक्रिया देईल, याची कोणीच अपेक्षा केली नसेल.
सिद्धार्थचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तो एअरपोर्टच्या दिशेने चालताना दिसत आहे. पापाराझी जेव्हा त्याला ऑस्करमधील भारताच्या विजयावर प्रतिक्रिया विचारतात, तेव्हा तो म्हणातो, “इथे पत्रकार परिषद सुरू का?” त्याची ही प्रतिक्रिया नेटकऱ्यांना अजिबात आवडली नाही. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
‘तो घाईत असला तरी दोन शब्द चांगलेसुद्धा बोलू शकला असता. मात्र अशी प्रतिक्रिया देण्याची काहीच गरज नव्हती’, असं एकाने लिहिलं. तर काहींनी बॉलिवूड विरुद्ध साऊथ फिल्म इंडस्ट्रीचा मुद्दा मांडला. बॉलिवूड कलाकार दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीच्या विजयावर जळतात, असंही एका युजरने म्हटलंय.
पहा व्हिडीओ
View this post on Instagram
‘नाटू नाटू’ या गाण्यासाठी संगीतकार एम. एम. किरवाणी आणि गीतकार चंद्रबोस यांनी पारितोषिक स्वीकारलं. ‘कारपेंटर्स’ या अमेरिकन बँडची गाणी ऐकत आपण लहानाचे मोठे झालो, अशी माहिती किरवाणी यांनी पुरस्कार स्वीकारताना दिली. कारपेंटर्स बँडच्या ‘टॉप ऑफ द वर्ल्ड’ या गाण्याच्या चालीवर शब्द रचत त्यांनी पुरस्काराचा आनंद व्यक्त केला. या गाण्यावर ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात डान्स परफॉर्म कऱण्यात आला. त्याआधी अभिनेत्री दीपिका पदुकोण त्याविषयी सांगत असताना अख्खा प्रेक्षकवर्ग गाण्याचं कौतुक करताना दिसत होता.
दिग्दर्शिका कार्तिकी गोन्साल्विस आणि निर्मात्या गुनीत मोंगा यांना ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या माहितीपटासाठी गौरविण्यात आलं. यापूर्वी गुनीत मोंगा यांनी ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘द लंचबॉक्स’, ‘मसान’, ‘पगलाइट’ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.