बाप इतका चुकीचा..; राज बब्बर-स्मिता पाटील यांच्या प्रेमप्रकरणाबद्दल मुलाचं वक्तव्य
राज बब्बर यांनी नादिरा यांच्याशी पहिलं लग्न केलं होतं. विवाहित असताना अभिनेत्री स्मिता पाटीलवर त्यांचं प्रेम जडलं होतं. यावर राज आणि नादिरा यांचा मुलगा आर्य बब्बर एका व्हिडीओत व्यक्त झाला आहे. राज बब्बर आणि स्मिता पाटील यांचं ते अफेअर नव्हतं, असं तो म्हणाला.

अभिनेते राज बब्बर यांचा मुलगा आर्य बब्बरने स्टँड-अप कॉमेडियन म्हणून करिअरची नवी वाट धरली आहे. अभिनयक्षेत्रात अपयश आल्यानंतर आर्य स्टँड-अप कॉमेडीकडे वळला. नुकत्याच एका परफॉर्मन्सदरम्यान त्याने स्वत:च्याच कुटुंबीयांबद्दल उपरोधिक विनोद केले. सावत्र भाऊ प्रतीक बब्बरने त्याच्या लग्नाला वडील आणि इतर कुटुंबीयांना न बोलावण्यावरून त्याने हे विनोद केले. ‘बब्बर साहब’ या युट्यूब चॅनलवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये आर्य त्याच्या वडिलांबद्दलही मोकळेपणे व्यक्त झाला. आर्य हा राज बब्बर आणि त्यांच्या पहिल्या पत्नी नादिरा बब्बर यांचा मुलगा आहे. राज यांनी अभिनेत्री स्मिता पाटील यांच्याशी दुसरं लग्न केलं होतं. मात्र प्रतीकच्या जन्मानंतर लगेचच स्मिता पाटील यांचं निधन झालं.
राज बब्बर हे नादिरा यांच्याशी विवाहित असताना स्मिता पाटील यांच्या प्रेमात पडले होते. या दोघांनी लग्न केलं. मात्र स्मिता पाटील यांच्या निधनानंतर राज पुन्हा त्यांच्या पहिल्या पत्नीकडे गेले. वडिलांच्या अफेअरबद्दल आर्य या व्हिडीओत म्हणाला, “जेव्हा मी 6-7 वर्षांचा होतो, तेव्हा मला लपाछपी खेळायला खूप आवडायचं. पण तेव्हा मी माझ्या मित्रांसोबत लपाछपी खेळत नव्हतो, तर मीडियासोबत खेळत होतो. ते कुठूनही माझ्यासमोर यायचे आणि तोंडासमोर माइक धरून मला विचारायचे की, तुझ्या वडिलांचं अफेअर सुरू आहे, तुला कसं वाटतंय?”




View this post on Instagram
स्मिता पाटील यांच्यावर वडिलांचं खरं प्रेम होतं, असं आर्य पुढे सांगतो. “प्रामाणिकपणे बोलायचं झाल्यास त्यांचं ते अफेअर नव्हतं. बाबा आणि स्मिता पाटील यांचं ते खरं प्रेम होतं. एक कुटुंब म्हणून आम्ही त्यांच्या नात्याला समजण्याचा प्रयत्न केला आणि ते स्वीकारलं. आम्ही त्या दोघांच्या नात्याचा आदर केला. पण जेव्हा तुम्ही सहा-सात वर्षांचे असता, तेव्हा तुम्हाला यातलं काहीच समजत नसतं. याच कारणामुळे वडिलांसोबतचं माझं नातं बिघडलं होतं. कारण मला त्यांच्याबद्दलच्या गोष्टी नीट कळतच नव्हत्या”, असं आर्य म्हणतो. यापुढे तो विनोद करत सांगतो, “आता वयाच्या 43 व्या वर्षी, 8 ते 9 वर्षांचा संसार केल्यानंतर मला ही गोष्ट समजतेय की, बाप इतना भी गलत नहीं था (वडील इतके पण चुकीचे नव्हते).”
“या नात्याची चांगली बाजू म्हणजे त्यामुळे मला एक छोटा भाऊ भेटला. माझ्या घरात जर मी कोणावर सर्वाधिक प्रेम करत असेन, तर तो माझा छोटा भाऊ प्रतीक आहे”, अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या. राज बब्बर आणि स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीकने नुकतंच गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जीशी दुसरं लग्न केलं. मात्र या लग्नाला त्याने वडिलांना आणि इतर कुटुंबीयांनाही बोलावलं नव्हतं.