सोनाक्षी सिन्हाच्या लग्नात पाणावले दुसऱ्या आईचे डोळे; अभिनेत्री म्हणाली “रडू नका..”
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने 23 जून रोजी प्रियकर झहीर इक्बालशी लग्न केलं. कुटुंबीय आणि मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांनी नोंदणी पद्धतीने हे लग्न केलं. या लग्नावरून गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा होत आहेत. मुस्लीम मुलाशी लग्न करत असल्याने सोनाक्षीच्या घरात तिच्याविरोधात नाराजी असल्याचं म्हटलं जातं होतं.
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाबद्दल कितीही ट्रोलिंग झाली तरी या दोघांच्या कुटुंबीयांसाठी, मित्रपरिवारासाठी आणि अत्यंत जवळच्या खास लोकांसाठी हा आनंदाचा क्षण होता. या क्षणाची ते गेल्या काही वर्षांपासून प्रतीक्षा करत होते. सोनाक्षीने आता लग्नाच्या 17 दिवसांनंतर रिसेप्शनचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सोनाक्षी आणि झहीरच्या रिसेप्शनमधील काही खास क्षण पहायला मिळत आहेत. ‘तेरी चुनरियाँ’, ‘छैय्या छैय्या’ यांसारख्या गाण्यांवर त्यांनी पाहुण्यांसोबत ठेका धरला होता. या व्हिडीओतील एका दृश्याने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं आहे. या व्हिडीओमध्ये सोनाक्षी आणि झहीरला एकत्र पाहून अभिनेत्री रेखा यांचे डोळे पाणावल्याचं पहायला मिळालं.
सोनाक्षीच्या लग्नानंतर रिसेप्शनमध्ये किती धमाल झाली, याची झलक या व्हिडीओमध्ये कैद करण्यात आली आहे. काजोल, हुमा कुरेशी, सिद्धार्थ, सलमान खान यांसारखे सेलिब्रिटींनी या रिसेप्शनमध्ये मनसोक्त जल्लोष केला. ज्येष्ठ अभिनेत्री रेखासुद्धा सोनाक्षीच्या रिसेप्शनला उपस्थित होत्या. तिला नववधूच्या रुपात पाहिल्यानंतर रेखा यांचे डोळे पाणावले होते. तेव्हा सोनाक्षी त्यांचं सांत्वन करताना दिसून आली. ‘रडू नका’, असं ती रेखा यांना म्हणताना दिसतेय.
View this post on Instagram
या व्हिडीओच्या सुरुवातीला नवविवाहित दाम्पत्याची दमदार एण्ट्री होते. त्यानंतर सोनाक्षी तिची खास मैत्रीण हुमा कुरेशीला मिठी मारते, काजोलसोबत सेल्फी क्लिक करते आणि अनिल कपूर यांच्यासोबत त्यांच्याच स्टाइलमध्ये डान्स करते. सोनाक्षीने सलमान खानच्या ‘दबंग’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय. त्यामुळे सलमानचं तिच्या आयुष्यात विशेष स्थान आहे. या रिसेप्शनमध्ये तिने सलमानला प्रेमाने मिठी मारली. त्यानंतर रेखा यांना भावूक होताना पाहत म्हणते, “रडू नका, रडायचं नाहीये.” सोनाक्षी रेखा यांना तिची दुसरी आई मानते. त्यामुळे या लग्नाला त्या आवर्जून उपस्थित होत्या. सोनाक्षीला पाहिल्यानंतर रेखा यांच्या भावना अनावर झाल्या. रेखा यांनी सोनाक्षीच्या वडिलांसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय.
झहीर आणि सोनाक्षीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. ‘हे खरं लग्न आहे, अंबानींची फक्त परेड सुरू आहे’, असं एकाने लिहिलंय. तर अभिनेत्री प्रिती झिंटानेही भलीमोठी कमेंट लिहित सोनाक्षीला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘तुम्ही दोघं एकमेकांसोबत खूप चांगले दिसता. लोकांच्या द्वेषाकडे लक्ष देऊ नका’, असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय.