Sonali Kulkarni | महिलांना ‘आळशी’ म्हणणं पडलं महागात; अखेर सोनाली कुलकर्णीने मागितली जाहीर माफी
एका मुलाखतीत सोनाली महिलांबद्दल म्हणाली, "भारतात, आपण अनेकदा ही गोष्ट विसरतो की अनेक महिला फक्त आळशी आहेत. त्यांना असा पती किंवा बॉयफ्रेंड हवा असतो तो खूप चांगला कमावतो, ज्याचं स्वत:चं घर आहे आणि ज्याला कामाच्या ठिकाणी चांगली बढती मिळते."
मुंबई : ‘दिल चाहता है’, ‘मिशन काश्मीर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारलेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. सोनालीच्या एका मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओत ती महिलांना ‘आळशी’ असं म्हटल्याने नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. सोशल मीडियावरील ठराविक वर्गाला तिची ही टिप्पणी नकारात्मक वाटल्याने तिच्यावर टीकांचा भडीमार झाला. यानंतर आता सोनालीने ट्विटरवर भलीमोठी पोस्ट लिहित जाहीर माफी मागितली आहे. या घटनेतून मी खूप काही शिकले, असंही तिने या पोस्टच्या अखेरीस लिहिलं आहे.
सोनाली कुलकर्णीने मागितली माफी
‘मला मिळत असलेल्या प्रतिक्रियांमुळे मी भारावून गेले आहे. मी संपूर्ण प्रेस आणि मीडियाचे आभार मानू इच्छिते, ज्यांचं माझ्याशी अत्यंत परिपक्व आचरण पहायला मिळालं. मी स्वत: एक स्त्री असल्याने इतर महिलांना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. उलट स्त्री असणं म्हणजे काय, याबाबत मी वारंवार व्यक्त झाले आहे. माझं कौतुक करण्यासाठी किंवा माझ्यावर टीका करण्यासाठी वैयक्तिकरित्या माझ्यापर्यंत पोहोचल्याबद्दल मी तुम्हा सर्वांची आभारी आहे’, असं तिने लिहिलं.
याविषयी तिने पुढे लिहिलं, ‘आपण विचारांची अधिक मुक्तपणे देवाणघेवाण करू शकू अशी आशा आहे. मी माझ्या क्षमतेनुसार केवळ महिलांनाच नाही तर संपूर्ण मानव जातीला पाठिंबा देण्याचा, त्याच्याबद्दल विचार करण्याचा आणि नात्यातील उबदारपणा शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे. जर आपण स्त्रियांनी सर्वसमावेक आणि एकमेकांप्रती सहानुभूती दाखवली तरच आपण विचारांनी मजबूत आणि आनंदी समाज निर्माण करू शकू.’
— sonalikulkarni (@sonalikulkarni) March 18, 2023
सोनालीने तिच्या वक्तव्यामुळे नाराज झालेल्यांची माफी मागितली. तिने लिहिलं, ‘हे सर्व म्हणत असतानाच जर नकळत मी कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी मनापासून माफी मागू इच्छिते. माझी तळमळ हेडलाइन्ससाठी नाही किंवा मला अशा परिस्थितीच्या केंद्रस्थानी राहायचं नाही. मी एक कट्टर आशावादी आहे आणि मला ठामपणे विश्वास आहे की हे जीवन खरंच खूप सुंदर आहे. तुम्ही दाखवलेल्या संयमाबद्दल आणि समर्थनाबद्दल धन्यवाद. या घटनेतून मी खूप काही शिकले आहे.’
महिलांबाबत काय म्हणाली होती सोनाली?
एका मुलाखतीत सोनाली महिलांबद्दल म्हणाली, “भारतात, आपण अनेकदा ही गोष्ट विसरतो की अनेक महिला फक्त आळशी आहेत. त्यांना असा पती किंवा बॉयफ्रेंड हवा असतो तो खूप चांगला कमावतो, ज्याचं स्वत:चं घर आहे आणि ज्याला कामाच्या ठिकाणी चांगली बढती मिळते. पण या सर्वांत महिला स्वत:साठी उभं राहायला विसरतात. ते स्वत: काय करू शकतात, हे ते विसरतात. मी प्रत्येकाला विनंती करते की महिलांना प्रोत्साहन द्या आणि त्यांना स्वावलंबी बनवा. जेणेकरून ते त्यांच्या जोडीदारासोबत मिळून घराचा खर्च उचलू शकतील.”