सोनू सूदला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर; पण ‘या’ भीतीमुळे नाकारली संधी
लॉकडाऊनच्या काळात आणि त्यानंतरही अभिनेता सोनू सूदने असंख्य गरजूंची दिलखुलासपणे मदत केली. म्हणूनच चाहते त्याला 'देवदूत' असंही म्हणतात. सोनूचा हाच स्वभाव पाहून त्याला अनेकदा राजकारणातील मोठमोठ्या ऑफर्स मिळाल्या आहेत.
कोरोना महामारी पसरल्यानंतर 2020 मध्ये देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्यावेळी स्थलांतरित कामगार, मजूर यांच्या मदतीला अभिनेता सोनू सूद जणू देवासारखाच धावून गेला. या काळात सोनू सूदने अनेकांची विविध प्रकारे मदत केली. इतकंच नव्हे तर लॉकडाऊन आणि कोरोना महामारीनंतरही त्याने हा मदतीचा ओघ कायम ठेवला आहे. नि:स्वार्थपणे गरजूंची मदत करण्याचा सोनू सूदचा हा स्वभाव पाहून अनेकांनी त्याला राजकारणात जाण्याचाही सल्ला दिला होता. किंबहुना राजकीय क्षेत्रातील अनेक ऑफर्स मिळाल्याचा खुलासा खुद्द सोनू सूदने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे. अनेक हाय प्रोफाइल ऑफर्स मिळाल्यानंतरही राजकारणात जाण्यात रस नसल्याचं त्याने स्पष्ट केलं.
‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ला दिलेल्या मुलाखतीत सोनू म्हणाला, “मला मुख्यमंत्रीपदाचीही ऑफर मिळाली आहे. मी जेव्हा ही ऑफर नाकारली, तेव्हा ते म्हणाले की, मग उपमुख्यमंत्री हो. देशातील काही प्रतिष्ठित लोकांनी मला राज्यसभेतील जागेचीही ऑफर दिली. तुला राजकारणात कोणत्याच गोष्टीसाठी झगडावं लागणार नाही. राज्यसभेची जागा घे आणि आमच्यासोबत मिळून काम कर, असं ते मला म्हणाले. जेव्हा अशी पॉवरफुल लोकं तुम्हाला भेटतात आणि या जगात काहीतरी बदल घडवण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहन देतात, तेव्हा मला खूप बरं वाटतं.”
या ऑफर्सवर आपला निर्णय सांगताना सोनू पुढे म्हणाला, “जेव्हा तुम्हाला लोकप्रियता मिळू लागते, तेव्हा तुम्ही आयुष्यात वरच्या दिशेने जात असता. पण जेव्हा तुम्ही एकदम वर पोहोचता, तेव्हा तिथे ऑक्सिजनची पातळी कमी होऊ लागते. आपल्याला पुढे जायचंय, पण एकदा वर पोहोचल्यानंतर तिथे किती काळ टिकणार हे अधिक महत्त्वाचं असतं. मला एका व्यक्तीने सुनावलं की, मोठमोठी लोकं तुला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदासारखे ऑफर्स देत आहेत आणि तू ते नाकारतोय? तुला माहितीये का की तुझ्या इंडस्ट्रीतील कितीतरी लोक याचं स्वप्नसुद्धा बघू शकत नाहीत आणि तू संधी नाकारतोय?”
View this post on Instagram
कोणत्याही ऑफर्सना बळी न पडता सोनू सूदने त्याच्या नितीमूल्यांशी एकनिष्ठ राहायचं ठरवलं आहे. “लोक दोन कारणांसाठी राजकारणात जातात. एक म्हणजे पैसा कमावणे आणि दुसरं म्हणजे पॉवर मिळवण्यासाठी. मला या दोन्ही गोष्टींमध्ये रस नाही. जर लोकांना मदत करण्याचा प्रश्न असेल तर ते मी आताही करतोय. सध्या तरी मला कोणाला विचारायची गरज नाहीये. जर मला एखाद्याची मदत करायची असेल तर त्याची जात, धर्म, भाषा हे सर्व न पाहता मी स्वत:च्या जोरावर त्याची मदत करेन. उद्या याच गोष्टीसाठी जर कोणी मला जबाबदार ठरवणार असेल, तर मला त्याची भीती वाटू शकते. मला माझं स्वातंत्र्य गमावण्याची भीती आहे”, अशा शब्दांत सोनू सूद व्यक्त झाला.
“मला उच्च दर्जाची सुरक्षा, दिल्लीत घर आणि प्रतिष्ठित स्थान मिळेल. एकाने सांगितलं की मला सरकारचा स्टँप असलेला लेटरहेडसुद्धा मिळेल, ज्याची खूप पॉवर असते. मी म्हटलं, की हे सगळं ऐकायला चांगलं वाटतंय. पण सध्या तरी मी या सर्व गोष्टींसाठी तयार नाही. कदाचित पुढे काही वर्षांनंतर मला वेगळं वाटू शकेल. कोणाला ठाऊक”, असंही मत त्याने मांडलंय.