बोनी कपूर यांच्या प्रपोजलनंतर श्रीदेवींनी धरला होता अबोला; “विवाहित अन् 2 मुलांचे पिता असून तुम्ही..”
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत निर्माते बोनी कपूर हे श्रीदेवी यांच्यासोबतच्या प्रेमकहाणीविषयी मोकळेपणे व्यक्त झाले. बोनी कपूर यांनी प्रपोज केल्यानंतर श्रीदेवी यांनी त्यांच्याशी जवळपास सहा महिने अबोला धरला होता.
निर्माते बोनी कपूर आणि अभिनेत्री श्रीदेवी यांची प्रेमकहाणी जगजाहीर आहे. विवाहित आणि दोन मुलांचे पिता असताना बोनी कपूर हे श्रीदेवी यांच्या प्रेमात पडले होते. श्रीदेवी यांचं मन जिंकण्यासाठी त्यांना बरेच प्रयत्न करावे लागले होते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते त्यांच्या प्रेमाविषयी आणि श्रीदेवी यांच्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाले. बोनी कपूर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यानंतर सुरुवातीला श्रीदेवी यांनी जवळपास सहा महिने त्यांच्याशी अबोला धरला होता. तर श्रीदेवी यांच्याबद्दल मनात असलेल्या भावनांविषयी ते पहिली पत्नी मोना शौरीलाही सर्वकाही खरं सांगितल्याचं त्यांनी म्हटलंय. बोनी कपूर आणि श्रीदेवी यांनी 1996 मध्ये लग्न केलं. या दोघांना जान्हवी आणि खुशी या दोन मुली आहेत.
‘एबीपी लाइव्ह’ला दिलेल्या मुलाखतीत बोनी कपूर म्हणाले, “मी तिच्यावर प्रेम करायचो, मी आजही तिच्यावर प्रेम करतो आणि माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत मी तिच्यावर प्रेम करत राहीन. तिचं मन जिंकण्यासाठी मला चार-पाच-सहा वर्षे लागली होती. जेव्हा मी तिला प्रपोज केलं, त्यानंतर सहा महिने तिने माझ्याशी बोलणं बंद केलं होतं. तू विवाहित आणि दोन मुलांचा पिता आहेत, माझ्याशी तू असं कसं बोलू शकतोस, असा सवाल तिने केला होता. पण माझ्या मनात तिच्याविषयी ज्या भावना होत्या, त्या मी तिला सांगितल्या आणि सुदैवाने नशिब माझ्या बाजूने होतं.”
View this post on Instagram
“प्रत्येक वर्षानुसार जोडप्यांमधील समजूतदारपणा हा वाढत गेला पाहिजे. कोणत्याही मतभेदांशिवाय केवळ गोड-गोड बोलणारे रिलेशनशिप्स फार काळ टिकत नाही. कोणतीच व्यक्ती परफेक्ट नसते. मीसुद्धा परफेक्ट नव्हतो. मी तिला प्रपोज करताना विवाहित होतो… पण मी कधीच कोणापासून काही लपवलं नव्हतं. मोना तिच्या अखेरच्या श्वासापर्यंत माझी चांगली मैत्रीण म्हणून राहिली. तुमच्या पार्टनरसोबत प्रामाणिक राहिलेलं कधीही चांगलंच असतं. त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या मुलांसोबतही प्रामाणिक असायला हवं. मी माझ्या मुलांसोबत एखाद्या मित्राप्रमाणे वागतो. मी त्यांचा मित्र, पिता आणि आईसुद्धा आहे”, असं ते पुढे म्हणाले.
श्रीदेवी आणि बोनी कपूर यांनी शिर्डीत गुपचूप लग्न केलं होतं. काही महिन्यांनंतर त्यांनी हे लग्न सर्वांसमोर जाहीर केलं होतं. लग्न जाहीर करताना श्रीदेवी गरोदर होत्या. त्यामुळे त्या लग्नाआधीच गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. 2 जून 1996 रोजी बोनी कपूर आणि श्रीदेवी यांनी शिर्डीत लग्न केलं होतं. त्यानंतर जानेवारी 1997 मध्ये त्यांनी श्रीदेवीच्या गरोदरपणामुळे लग्न जाहीर केलं होतं.